पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावणारे वैद्यकीय आणि शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर आक्रमण करणारे जनताद्रोहीच होत !

मुंबई – कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील आक्रमणाच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी आक्रमणे करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.

या वेळी अजित पवार पुढे म्हणाले की, पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त अन् संयम पाळावा. ‘लॉकडाऊन’च्या कार्यवाहीसाठी अमेरिकेत लष्कराचे साहाय्य घेण्यात आले आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे, हे आपले सर्वांचे दायित्व आहे. राज्यात ‘लॉकडाऊन’ (दळणवळण बंदी), संचारबंदी असली, तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, अन्न शिजवण्याचा गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित चालू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा वसाहतीच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे. बारामती, वाई शहरांत अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकाकी रहात असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर रहाणारे, गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाज, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे यावे. प्रवासबंदी असतांना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. हा निष्काळजीपणा चिंताजनक आहे. वसईमध्ये अधिकार्‍याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर घायाळ करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे. पोलिसांना सहकार्य करावे. आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी.