रुग्णसेवा नाकारल्यास खासगी रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

मुंबई – काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्‍या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करत आहेत; मात्र काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत आहेत. आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व आधुनिक वैद्य आणि रुग्णालयांचे विश्‍वस्त यांनी रुग्णालयात येणार्‍या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपल्या परीने सेवा द्यावी. रुग्णसेवा नाकारल्यास त्या रुग्णालयाचे अनुमतीपत्र रहित करण्यात येईल, अशी चेतावणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.