मुंबईत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ११२ जणांवर गुन्हे नोंद

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात १४४ कलमान्वये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या शहरातील ११२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये प्रार्थनास्थळांचे विश्‍वस्त, दुकाने आणि उपाहारगृहे यांचे मालक यांचा समावेश आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना १ मास साध्या कारागृहवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.

यामध्ये १६ उपाहारगृहे, पानाच्या ६ टपर्‍या आणि अन्य ५३ दुकाने यांचे मालक, १८ फेरीवाले, वस्तूंची अवैधरित्या वाहतूक करणारे ६ जण, जमावबंदीच्या आदेशाचे पालन न करणारे १० जण आणि कोरोना संशयित असूनही बाहेर फिरणारे ३ जण यांचा समावेश आहे. बंदर विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संशयित म्हणून २ आठवडे घरी रहाण्याची सूचना देऊनही बाहेर फिरणार्‍या ३ जणांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.

 नमाजपठणासाठी एकत्र आल्याच्या प्रकरणी मशिदीच्या विश्‍वस्तांवर गुन्हा नोंद

डोंगरीच्या टेमकर स्ट्रीट येथील मशिदीत २३ मार्च या दिवशी नमाजपठणासाठी १५० हून अधिक जण एकत्र आले होते. या सर्वांना डोंगरी विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी समजूत काढून पांगवले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या मशिदीच्या विश्‍वस्तांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.