६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. कल्पना कार्येकर यांनी केलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

‘११.४.२०१९ या दिवशी दादर, मुंबई येथील साधिका सौ. कल्पना कार्येकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. सौ. कार्येकर यांच्यामध्ये अपेक्षा करणे, मनाने वागणे, अधिकारवाणीने बोलणे, उतावळेपणा इत्यादी अहंचे पैलू आणि स्वभावदोष होते. त्यामुळे त्यांच्यात काही चांगले गुण असूनही त्यांच्या साधनेची हानी होत होती. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि साधक यांनी त्यांना वेळोवेळी त्याची जाणीव करून देऊन मार्गदर्शन केले.

‘११.४.२०१९ या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्यानंतर बर्‍याच साधकांनी मला विचारले, ‘‘तुम्ही कसे प्रयत्न केलेत ?’, ते आम्हाला सांगा.’’ मी देवाला विचारले, ‘हे देवा, तू मला कसे घडवलेस, ते तूच मला सांग.’ त्या वेळी अनेक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आले. माझ्यातील अहं आणि स्वभावदोष यांमुळे घडलेले हे प्रसंग आणि त्यांतून देवाने माझ्याकडून करवून घेतलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

या लेखातील पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज उर्वरित भाग पाहूया.

४. सद्गुुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेली कृपा

सौ. कल्पना कार्येकर

४ अ. घरी नामजप करतांना झोप लागत असल्याने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सेवाकेंद्रात येऊन नामजप करण्यास सांगणे : माझ्याकडून २ घंटे नामजप होत नसे. घरी नामजप करतांना मी झोपत असे; म्हणून सद्गुरु अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही घरातली सर्व कामे आटपून सेवाकेंद्रात या आणि प्रतिदिन सेवाकेंद्रातच नामजप करा. त्यानंतर तुम्ही सेवा करा.’’ सेवाकेंद्रात नामजप करतांना मला झोप येऊ लागली, तर शेजारी बसलेले साधक मला उठवत असत. तेव्हा ‘माझ्यापेक्षा माझ्या साधनेची काळजी संत आणि सद्गुरु यांनाच अधिक आहे’, असे मला जाणवले.

४ आ. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी भाववृद्धीसाठी देवाला आळवून त्याचे साहाय्य घेण्यास सांगणे : मी देवाचे साहाय्य न घेता बुद्धीने सेवा करत असे. माझे भाववृद्धीचे प्रयत्न होत नव्हते. याची मला अधून-मधून जाणीव व्हायची. मला पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांनी भाववृद्धी करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मला त्यासाठी देवाला आर्ततेने आळवून त्याचे साहाय्य घेण्यास सांगितले. त्यानंतर मी देवाकडे आर्ततेने विनवणी केली, ‘हे देवा, तू माझ्या व्यवहारातील सर्व समस्या दूर केल्या आहेस. माझ्या साधनेतील सर्व अडथळे दूर केले आहेस. यासाठी माझ्या मनात तुझ्याप्रती कृतज्ञताभाव सतत जागृत राहू दे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी तूच माझ्याकडून प्रयत्न करवून घे. तू मला या स्थितीतून बाहेर काढ.’ त्यानंतर माझे देवाशी बोलणे वाढले. ‘देवा, इतके दिवस मी जिल्हा सत्संगातील सूत्रे, तसेच सद्गुरु आणि संत यांच्या मार्गर्शनाचा काहीही उपयोग करून घेतला नाही. तू माझ्यावर कृपा कर. माझी व्यष्टी साधना करून घे.’

५. ‘गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे’, असा मनाचा निश्‍चय करून व्यष्टी साधना नियमित होण्यासाठी तळमळीने केलेले प्रयत्न

२.४.२०१९ या दिवशी सनातनच्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधनेसाठी पुढील २० दिवस अनुकूल आहेत’, अशा आशयाचा लेख आला होता. त्या रात्री त्या लेखाविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडयेे यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगितले, ‘‘२० दिवस हा पुरेसा कालावधी आहे. साधकांनी झोकून देऊन प्रयत्न केले, तर त्यांची नक्कीच प्रगती होईल.’’ माझ्या अंतर्मनात सद्गुरूंचे हे वाक्य कोरले गेले. ‘या २० दिवसांत गुरुदेवांचे मन जिंकायचे आहे’, असा माझ्या बुद्धीचा निश्‍चय देवाने करून घेतला आणि माझे पुढील प्रयत्न चालू झाले.

अ. ‘चिंतन सारणीतील प्रत्येक सूत्र कृतीत आणणे

आ. ‘अनावश्यक बोलणे आणि अनावश्यक विचार करणे’ या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी सतत नामजप करणे

इ. सकाळी लवकर उठून नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांद्वारे देवाची आळवणी करणे

ई. ठरवलेल्या वेळेत स्वयंसूचना सत्रे करणे

उ. झालेल्या चुका सारणीत लिहिणे

ऊ. चूक झाल्यावर लगेच संबंधितांची क्षमा मागणे.

या सर्व प्रयत्नांची गती दुसर्‍या दिवशी थोडी न्यून झाली. तेव्हा मला लगेचच त्याची जाणीव झाली आणि मी ‘ही गती माझ्या कोणत्या दोषामुळे न्यून झाली ?’ हे शोधून देवाची क्षमायाचना केली. मी पुन्हा प्रयत्न चालू केले. स्वतःच्या व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी माझ्याकडून यापूर्वी असे प्रयत्न कधीच झाले नव्हते. २.४.२०१९ या दिवसापासून माझे प्रयत्न प्रतिदिन होऊ लागले. हा सर्व माझ्यासाठी एक चमत्कारच होता.

६. गुरुपौर्णिमेला शेष असलेल्या प्रत्येक दिवसागणिक मन गुरुदेवांचा धावा करू लागणे आणि व्यष्टी साधना तळमळीने करणे

‘गुरुपौर्णिमेच्या काळात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘गुरुपौर्णिमेला ३० दिवसांचा अवधी शेष आहे’, नंतर ‘२९ दिवस उरले आहेत’, अशी चौकट प्रतिदिन प्रसिद्ध होत असे. यापूर्वी हे वाचून मला कधीच काही वाटले नव्हतेे; पण या वेळी ते वाचतांना ‘श्रीगुरूंचे मन जिंकण्यासाठी एवढे अल्प दिवस राहिले’, असे वाटून मी श्रीगुरूंचा सतत धावा करू लागले. याच कालावधीत नातेवाइकांकडे जावे लागणार होते; परंतु ‘नातेवाइकांकडे गेले, तर माझ्या व्यष्टी साधनेवर परिणाम होईल’, असा विचार करून मी ‘या २० दिवसांत कुठेही जायचे नाही’, असा निश्‍चय केला. देवानेच तो करून घेतला. माझ्या मनाची अशी स्थिती याआधी कधीच नव्हती. ‘देवच माझ्याकडून हे सगळे करवून घेत आहे’, हे लक्षात येऊन माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.

७. झोकून देऊन प्रयत्न केल्याने लवकरच देवाच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे

असे प्रयत्न चालू असतांनाच ११.४.२०१९ या दिवशी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी एका कार्यक्रमात माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित केले. तेव्हा ‘सनातनच्या ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेल्या (२० दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याला ८ दिवस शेष असतांनाच) केवळ इतक्या अल्प कालावधीतील प्रयत्नाने असा चमत्कार कसा घडला ?’, असा विचार येऊन मी गुरुदेवांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. ‘माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यामुळेच माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत होते. देवाने मला आधीपासूनच घडवायला आरंभ केला होता. देव प्रत्येक प्रसंगातून आपल्या नकळत आपल्याला घडवत असतो’, असे वाटून मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

‘आम्हा सर्व साधकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित होऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’  (समाप्त)

– सौ. कल्पना कार्येकर, दादर, मुंबई. (ऑगस्ट २०१९)