पुणे येथील पहिले कोरोनाबाधित दांपत्य ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडले

पुढील १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’

पुणे – कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारानंतर २४ आणि २५ मार्चला त्यांची चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्यांमध्ये त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचे आढळून आले नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील १४ दिवस त्यांना स्वतःला ‘होम क्वारंटाइन’ करून घ्यावे लागणार आहे. ‘घरी गेल्यावर शेजार्‍यांनी किंवा अन्य कुणी विरोध करण्याची अनुचित घटना घडू नये; म्हणून पोलीस तेथे असावेत’, असा आरोग्य विभागाचा नियम (प्रोटोकॉल) आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात हे दांपत्य घरी परतले. नायडू रुग्णालयातून बाहेर पडतांना रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आनंदाने टाळ्या वाजवून या दांपत्याला निरोप दिला.