कोरोनामुळे संपूर्ण जग भयावह मंदीच्या खाईत लोटले जाईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

नवी देहली – कोरोनामुळे संपूर्ण जगाला गंभीर आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. वर्ष २००८ मध्ये आलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटानंतर वर्ष २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये ०.६ टक्के इतकी घसरण झाली होती; पण त्या वेळी भारत आणि चीन यांसारख्या विकसनशील देशांमधील बाजारात तेजी आली होती. कोरोनामुळे आर्थिक हानी होण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. त्यामुळे या वेळी येणारी मंदी ही वर्ष २००८-०९ मध्ये आलेल्या मंदीपेक्षाही भयावह स्वरूपाची असणार आहे, अशी चेतावणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी दिली आहे. जॉर्जिवा यांनी ‘जी-२०’ देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँका यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, आपण किती लवकर कोरोनाच्या संक्रमणाचे नियंत्रण करतो, यावरच सर्व गोष्टी अवलंबून आहेत. छोटी अर्थव्यवस्था असणार्‍या देशांच्या साहाय्यासाठी विकसनशील अर्थव्यवस्था असणार्‍या देशांनी पुढे येऊन साहाय्य करणे आवश्यक आहे. नाणेनिधीकडे १ ट्रिलियन डॉलर उधार देण्याची क्षमता आहे आणि तेवढे साहाय्य आम्ही करू, अशीही सिद्धता जॉर्जिवा यांनी दर्शवली आहे.