अमेरिकेत कोरोनामुळे २४ घंट्यांत ११७ जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन – अमेरिकेमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील २४ घंट्यांमध्ये ११७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा ४१९ झाला आहे. याचसमवेत अमेरिकेत या रोगाची लागण झालेले ९ सहस्र ३३९ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. या नवीन रुग्णांमुळे अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३३ सहस्र ५४६ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत १७८ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक १५ सहस्र ७९० रुग्ण आढळले असून ११४ जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्कमध्येही ‘लॉकडाऊन’

न्यूयॉर्कमध्ये ‘लॉकडाऊन’ (केवळ जीवनावश्यक सेवा चालू रहाणे आणि इतर सर्व सेवा बंद असणे, याला ‘लॉकडाऊन’ म्हणतात.) करण्यात आले आहे. येथील उपाहारगृहे आणि मॉल यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपत्कालीन व्यवस्थापन समितीला वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया अणि न्यूयॉर्क येथे फिरती रुग्णालये उभारण्याचा आदेश दिला आहे.

इराणमध्ये एक दिवसात १२७ जणांचा मृत्यू

इराणमध्ये कोरोनामुळे एक दिवसात १२७ जणांचा मृत्यू, तर १ सहस्र ४११ नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच आतापर्यंत १ सहस्र ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इराणमध्ये २३ सहस्र ४९ जणांना लागण झाली आहे.