Trump Stops Harvard Funding : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हार्वर्ड विश्वविद्यालयाला देण्यात येणार्‍या १८ सहस्र कोटींहून अधिक निधी रोखला !

विश्वविद्यालयामध्ये इस्लामी कट्टरतावादी कारवाया वाढल्यामुळे घेतला निर्णय !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

न्यूर्यार्क (अमेरिका) – जागतिक स्तरावरील प्रतिथयश विश्वविद्यालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या हार्वर्ड विश्वविद्यालयाला देण्यात येणार्‍या २.२ अब्ज डॉलर्सचा (अनुमाने १८ सहस्र कोटी रुपयांचा) निधी ट्रम्प सरकारने रोखला आहे. विश्वविद्यालयात वाढत्या कट्टरतावादी कारवायांमुळे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. विश्वविद्यालयांमध्ये ज्यूंविरुद्ध द्वेष पसरवल्याच्या सतत तक्रारी येत होत्या, तसेच तेथे आतंकवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली होती. याविषयी वारंवार तक्रारी करूनही विश्वविद्यालयाचे प्रशासन त्यांना रोखण्यात असमर्थ ठरले आहे. ट्रम्प प्रशासनाने विश्वविद्यालयावर ज्यू प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी भेदभाव केल्याचा आरोपही केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने केल्या होत्या काही सूचना !

हा निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हार्वर्ड विश्वविद्यालयाला एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी विश्वविद्यालयाच्या प्रशासनाला अनेक मोठे पालट करण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, प्रशासनाला आतंकवाद्यांना पाठिंबा देणार्‍या विद्यार्थ्यांना ओळखावे लागेल, तसेच विश्वविद्यालयामध्ये आतंकवादाचा होणारा पुरस्कार थांबवावा लागेल. ट्रम्प यांनी विश्वविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचीही सूचना केली  होती. हार्वर्ड प्रशासनाने या सूचना मान्य करण्यास नकार दिला. विश्वविद्यालयामध्ये आतंकवादाला पाठिंबा देणार्‍या विद्यार्थ्यांचा शोध, हा त्यांच्या स्वातंत्र्यावरील आक्रमण असल्याचे वर्णन विश्वविद्यालयाच्या प्रशासनाने केले. यानंतर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला.

९ अब्ज डॉलर्सचा निधीही रोखणार !

ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, विश्वविद्यालयाचा हा घातक दृष्टीकोन अमेरिकी कायद्यांचे उल्लंघन आहे. सरकारकडून देण्यात येणारा ९ अब्ज डॉलर्सचा वेगळा निधी थांबवण्याचाही विचार चालू आहे. ट्रम्प प्रशासनाचा असा विश्वास आहे की, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध विश्वविद्यालयांना तेथे चालणार्‍या घातक कृत्यांसाठी उत्तरदायी धरले पाहिजे. जेव्हा अशी विश्वविद्यालये निष्पक्ष नसतील, तेव्हा त्यांना सरकारी निधी देऊ नये.

हार्वर्डच्या प्राध्यापकांकडून ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला प्रविष्ट !

हार्वर्ड विश्वविद्यालयातील काही प्राध्यापकांनीही राष्ट्र्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. प्राध्यापकांचे म्हणणे आहे की, सरकारी निधी रोखणे, हा विश्वविद्यालयाच्या स्वायत्ततेवर आक्रमण असून ही कृती राज्यघटनाविरोधी आहे. प्राध्यापकांच्या २ गटांनी जिल्हा न्यायालयात ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. विश्वविद्यालयाचा निधी थांबवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असे त्यात म्हटले आहे.

हार्वर्ड विश्वविद्यालयात चालणार्‍या विघातक कारवाया !

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या वेळी हार्वर्ड येथे अनेक मोर्चे काढण्यात आले. यांमध्ये ‘अमेरिकेने इस्रायलशी असलेली मैत्री तोडावी’, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चांमध्ये हमासचे उघडपणे समर्थन करण्यात आले. काही मोर्चांमध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणांचे समर्थन करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अशा घटकांवर कारवाई केली जात आहे. अलीकडच्या काळात हार्वर्ड विश्वविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना बिगर यहूदी आणि अल्पसंख्य यांना प्राधान्य दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने अशा भेदभाव करणार्‍या कृती थांबवाव्यात आणि प्रवेशासाठी पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित प्रणाली स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, तसेच अन्य महाविद्यालये ही  भारतविरोधी आणि हिंदूविरोधी कारवायांचा अड्डा बनली आहेत. जसा ट्रम्प सरकारने निर्णय घेतला, तसा निर्णय घेण्याची धमक भारत सरकार दाखवणार का ?
  • कोणत्याही विरोधाला न जुमानता सातत्याने राष्ट्रहितार्थ निर्णय घेणार्‍या ट्रम्प सरकारकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे !