मुंबई सेवाकेंद्रामध्ये प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना सेवेच्या संदर्भात शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !

‘१३ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याविषयीचा प.पू. डॉक्टरांचा अलौकिक निर्णय आणि प.पू. डॉक्टर यांच्या सहवासात मुंबई सेवाकेंद्रात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भात शिकायला मिळालेली काही सूत्रे पाहिली. आता आपण सेवाकेंद्रात प्रथमच आलेल्या साधकाने अनुभवलेली प.पू. डॉक्टरांची प्रीती आणि प.पू. डॉक्टरांनी दिलेल्या विविध सेवांतून झालेली माझी घडण्याची प्रक्रिया, तसेच मला जाणवलेली त्यांची काही वैशिष्ट्ये पाहूया.      (भाग ४)

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा साधनाप्रवास

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902274.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांच्या सहवासात असतांना शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे !

८ आ. शिकायला मिळालेली अनेक कौशल्ये

१. एखादे नियतकालिक चालवायचे, तर ‘त्यात घेण्यासाठी लिखाणाची निवड करणे आणि त्याचे अंतिम संस्करण (म्हणजे नियतकालिकात ते प्रसिद्ध होईपर्यंतच्या कृती) करणे’, ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. ते करतांना ‘आपले उद्दिष्ट, ध्येय आणि लिखाण’, यांची सांगड घालावी लागते.

आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत

२. सनातनसारखी स्वयंसेवी संघटना विशिष्ट ध्येयाने ‘साप्ताहिक’ चालवत असतांना मला ‘या कार्याचे दायित्व योग्य प्रकारे कसे सांभाळायचे ?’, ते शिकायला मिळाले.

३. साप्ताहिक चालवतांना ‘न कंटाळता सतत कार्यरत रहाणे’, महत्त्वाचे आहे. एक साप्ताहिक पूर्ण होऊन पुढे देण्याआधीच पुढच्या साप्ताहिकाची जुळणी करावी लागते.

४. त्यासाठी सर्वच प्रकारच्या छोट्या-मोठ्या गोष्टींची कुशलता शिकून घ्यावी लागते. ‘अत्यंत अल्प वेळेत प.पू. डॉक्टर हे कसे साध्य करतात ?’, ते मला शिकायला मिळाले.

५. एखाद्या साधकाने अगदी कशाही प्रकारची चार वाक्ये पाठवली, तरी ते लिखाण साप्ताहिकात घ्यायचे आणि ते लगेच घेता येत नसेल, तर ते भविष्यासाठी सुरक्षित ठेवायचे असते.

६. साधकाला त्याचे लिखाण फार महत्त्वाचे असते. साधकाचा भाव लक्षात घेऊन ते लिखाण अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक हाताळायला हवे अन् यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात.

८ इ. ‘प.पू. डॉक्टर साधकांना कसे हाताळतात ?’, हे शिकायला मिळणे : सेवाकेंद्रात रहात असतांना प.पू. डॉक्टर साधकांना कसे हाताळतात ? तेही मला शिकायला मिळाले.

८ इ १. बाहेरून आलेल्या प्रत्येक साधकाचा सेवाकेंद्रातील इतर साधकांशी परिचय करून देणे : एखादा साधक सेवाकेंद्रात काही घंट्यांसाठी आला असला, तरी प.पू. डॉक्टरांचे त्याच्याशी प्राथमिक बोलणे होत असे आणि त्याचे चहा-पाणी झाल्यावर त्याचा सेवाकेंद्रातील इतर साधकांशी परिचय करून दिला जात असे.

८ इ २. येणार्‍या प्रत्येक साधकाला त्याचा उपलब्ध वेळ आणि क्षमता यांनुसार सेवा देणे : प.पू. डॉक्टर आलेल्या साधकाचा उपलब्ध वेळ आणि क्षमता यांनुसार त्याला काही सेवा काढून ठेवत असत किंवा ‘त्याला कोणती सेवा द्यावी ?’, हे सांगत असत. यामुळे आलेल्या प्रत्येक साधकाला सेवाकेंद्र आणि तेथील साधक आपले वाटू लागत. सेवाकेंद्रातील साधकांसह राहिल्याने त्याला शिस्त इत्यादींची अप्रत्यक्ष शिकवण मिळत असे आणि कार्य अन् साधक यांच्याकडे पहाण्याची त्याची दृष्टी पालटत असे.

८ इ ३. आश्रमात आलेल्या प्रत्येक साधकाकडे लक्ष असणे : बाहेरून आलेल्या साधकाचे प्रसारातील काही सूत्र प्रलंबित असेल, तर प.पू. डॉक्टर त्याला सेवाकेंद्रातील संबंधित साधकाशी त्याविषयी बोलून घ्यायला सांगत. त्याच्या समवेत काही वस्तू द्यायच्या असतील, तर त्या त्याच्याकडे द्यायला सांगत. अशा प्रकारे प.पू. डॉक्टरांचे बाहेरून आलेल्या साधकांकडे चांगले लक्ष असे.

८ इ ४. डॉ. सामंत यांना प्रसारातील सत्संगाला पाठवून त्यांचा तेथील साधक आणि कार्य यांच्याशी परिचय करून देणे : मी सेवाकेंद्रात असतांना माझा मुंबईचे कार्य आणि तेथील साधक यांच्याशी परिचय व्हावा, यासाठी प.पू. डॉक्टरांनी मला प्रसारातील सत्संगांना पाठवले. त्यांनी मला काही साधकांच्या घरीही पाठवले, तसेच त्यांनी मला काही कार्यालयीन कामकाजासाठी अन्य ठिकाणीही पाठवले आणि ‘मला संस्थेशी निगडित शासकीय कामांचा परिचय होईल’, अशी व्यवस्था केली.

८ ई. सेवाकेंद्रात प्रथमच आलेल्या साधकाने प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती !

८ ई १. सेवाकेंद्रात आलेल्या साधकाला अन्य साधकांची वैशिष्ट्ये सांगणे : सेवाकेंद्रात नवीन आलेल्या साधकाला प.पू. डॉक्टर सेवाकेंद्रातील अन्य साधकांचे गुण सांगत असत. उदाहरणार्थ त्या वेळी संदीप आळशी (आताचे सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी) हे नोकरी करत होते आणि संध्याकाळी सेवाकेंद्रात येऊन शुद्धलेखन तपासत असत. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘पहा, संदीप तरुण आहे, तरी संध्याकाळचा वेळ इकडे-तिकडे न घालवता नोकरी झाली की, लगेच इकडे येतो. एकाग्रतेने शुद्धलेखन पडताळणीची सेवा करतो आणि नंतर घरी जातो, हे शिकण्यासारखे आहे.’’

सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) हेसुद्धा त्या वेळी सेवाकेंद्रात सेवा करत होते. एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘पहा, सत्यवानमध्ये किती भाव आहे !’’

८ ई २. सेवाकेंद्रात आलेल्या साधकाला काहीतरी शिकायला मिळावे आणि त्याची सेवा व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे प.पू. डॉक्टर ! : मी प्रथमच काही घंट्यांसाठी सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला सर्व साधकांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी मला तेव्हा ‘गुरुकृपायोग’ या ग्रंथाची रचना, मांडणी आणि संकलन चालू असल्याने त्याचे काही छापील कागद पडताळायला दिले. त्यांनी मला त्यामधील सूत्रांचे मथळे आणि त्याखाली लिहिलेली सूत्रे पडताळायला दिली होती. मला जेथे ‘पालट हवा’, असे वाटले, तेथे मी खूण करत होतो. मला फारच अल्प खुणा कराव्या लागत. त्यातील पुष्कळशी सूत्रे प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) यांच्याविषयीची होती. माझ्यासाठी हे सर्वच अत्यंत नवीन होते.

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२४)                         (क्रमशः)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/902972.html