हा लेख मी १० वर्षांपूर्वी लिहिला होता. त्याचा सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णायातील घटनेशी संबंध जवळचा वाटत आहे, म्हणून पुन्हा येथे देत आहे.
१. सध्याची स्थिती
कोणत्याही रुग्णालयामध्ये भरती झालेल्या रुग्णांपैकी १०० टक्के रुग्ण कधीच बरे होत नसतात. काहींमध्ये अपेक्षित किंवा काहींमध्ये अनपेक्षित गुंतागुंत होतच असते. ज्यांच्याविषयी सर्व सुरळीत होते, त्यांना चांगले दिसते; परंतु ज्यांना दुर्दैवाने वाईट अनुभव येतो, त्यांना केवळ चुका दिसतात किंवा चुकांचे खापर फोडायला डॉक्टर किंवा रुग्णालय व्यवस्थापन दिसते.

रुग्ण आणि नातेवाईक यांना शस्त्रक्रिया करण्यापूर्वी लिखित नमुन्यात सल्ला दिलेला असतो. धोके सांगितलेले असतातच ! कोणत्याही डॉक्टरला त्यांच्याकडे आलेला रुग्ण हा धोक्याच्या पातळीवर जावा, असे वाटत नाही. अगोदर समुपदेशन करतांना उपस्थित असणारे नातेवाईक काही गुंतागुत झाली, तर पळून जातात. रुग्णालयाचे देयक भरतांना तर घरातील वयोवृद्ध माणसे पुढे येतात. गल्लीतील पुढारी किंवा स्थानिक आमदार यांचे दूरभाष येतात. त्यांचीही चूक नसते; कारण शेवटी हीच माणसे त्यांचे मतदार असतात. कितीतरी वेळा अगोदरच असे चतुर लोकप्रतिनिधी सांगतात, ‘डॉक्टर, आम्हाला कार्य करण्यासाठी रुग्णालय देयकात काहीतरी आगाऊ रक्कम (मार्जिन) ठेवा बरं का !’
‘आता तर डॉक्टर आणि रुग्णालय हा संबंध केवळ रुग्णसेवेपुरता येणार’, असे भविष्य लिहून ठेवले आहे. बाकी त्याचे देयक, रुग्णालय कर्मचारी, रुग्णालयाची विज्ञापने, कायदेशीर गोष्टी आदी डॉक्टरने बघायच्या गोष्टी रहाणार नाहीतच ! एकखांबी तंबू उभारण्याचे दिवस संपले आहेत.
२. आरोग्याशी संबंधित सर्व सेवा रुग्णाला एकत्र मिळण्यासाठी उपाय
आरोग्याशी संबंधित सर्व सेवा रुग्णाला एका तंबूखाली हव्या असतील, तर एका डॉक्टरचे ते कामच नाही. त्याचे लाभ केवळ गुंतागुंतीचे अनेक आजार एकाच व्यक्तीमध्ये असणार्या रुग्णाला असतात. ज्यांना अत्यंत महागड्या अशा उपकरणांची आवश्यकता असते. गुंतागुंतीचे आजार झालेल्या मंडळीना असतात; परंतु तोटे मात्र साध्या आजाराच्या रुग्णांना भोगायला लागतात. यावर उपाय २ आहेत.
अ. एक म्हणजे स्वतः रुग्णाने धडधाकट असतांना स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा आरोग्य विमा उतरवणे.
आ. दुसरा उपाय शासन दरबारी नेते, आमदार, खासदार, तसेच शासकीय अधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये सरकारी नि:शुल्क चालणारे दवाखाने, लहान रुग्णालये आणि एक तरी वैद्यकीय महाविद्यालय असणारे सुसज्ज रुग्णालय असावे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे ! तेही डॉक्टर आणि कर्मचारी सरकारी वेतनाला (खाल्ल्या मिठाला) जागून वेळेवर प्रामाणिक काम करतात का ? ते पहाणे.
लक्षात असू दे की, डॉक्टर कुणाचाही मृत्यू केवळ आजचा उद्यावर ढकलत असतो, अगदी त्याचा स्वतःचाही ! आयुष्याच्या रेषेची लांबी कशी वाढेल आणि तो प्रवास वेदनारहित कसा होईल ? ते खरा डॉक्टर बघत असतो. शेवटी तोही माणूस आहे, देव नाही आणि दानव तर मुळीच नाही.
– डॉ. संदीप गजानन श्रोत्री, ‘असोसिएशन ऑफ हॉस्पिटल ओनर्स’, सातारा.