Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट !

गोव्यात होणार ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

पणजी – सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या स्वागत समितीच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.

या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, तसेच सनातनच्या संत पू. (सौ.) ज्योती ढवळीकर, पू. पृथ्वीराज हजारे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच सर्वश्री नारायण नाडकर्णी, धनंजय हर्षे आणि अधिवक्ता राजेश गावकर यांनी माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच त्यांना महोत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण दिले.

फर्मागुडी, फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात हा महोत्सव होणार आहे. गोवा सरकारच्या वतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.