सत्ता आणि मुलींचे शिक्षण यांवरून तालिबान सरकारमध्ये फूट !

  • तालिबानच्या हक्कानी आणि कंधारी या गटांमध्ये मतभेद !

  • सिराजुद्दीन हक्कानी याची तालिबानच्या प्रमुखाला थेट धमकी !

काबुल (अफगाणिस्तान ) –  वर्ष २०२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानी आतंकवाद्यांच्या सरकारमधील वाद वाढत चालला आहे. सत्ता आणि मुलींचे शिक्षण यांवरून सरकारमध्ये फूट पडली आहे. तालिबानच्या हक्कानी आणि कंधारी या गटांमध्ये सत्तेच्या संघर्षामुळे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच सिराजुद्दीन हक्कानी याने तालिबानचा प्रमुख अखुदजादा याला थेट धमकी दिल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. त्यातच तालिबान सरकारचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी हे अनुमाने एक महिन्यापासून अफगाणिस्तानाबाहेर आहे, तसेच त्याचे जवळचे सहकारी मुल्ला बरादर आणि अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री शेर महंमद स्तानेकझाई हे देखील विदेशात आहेत. त्यामुळे अफगाणमध्ये सत्तापालटाची जोरदार चर्चा आहे.

१. सीएन्एन् न्यूज १८ च्या वृत्तानुसार, कंदहारमधील हैबतुल्ला अखुंदजादा गट  (कंधारी गट) ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या प्रभावाखाली आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्यानेही हा वाद अधिकच तीव्र होत चालला आहे.

२. हक्कानी गट उदारमतवादी असल्याचे म्हटले जाते आणि मुलींच्या शिक्षणासारख्या सूत्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाशी वाटाघाटी करण्यास सिद्ध आहे.

३. कंधारी गटाला हक्कानी गटाची शक्ती अल्प करायची आहे. कंधारी गटाने महत्त्वाच्या सैनिकी तळांवर नियंत्रण मिळवले आहे.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांचे सरकार असल्यावर ते एकमेकांना मारून मरतील, हे उघड आहे !