‘होमिओपॅथी’ या चिकित्सापद्धतीचा शोध लावणारे जर्मनी येथील डॉ. सॅम्युएल हानेमान आणि ‘होमिओपॅथी’ची मूलभूत तत्त्वे !

१० एप्रिल २०२५ या दिवशी होमिओपॅथीचे जनक डॉ. हानेमान यांचा जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने…

‘होमिओपॅथी’ या चिकित्सापद्धतीचा शोध जर्मनी येथील डॉ. सॅम्युएल हानेमान यांनी लावला. त्यांचा जन्म १० एप्रिल १७५५ या दिवशी झाला आणि त्यांचे देहावसान २ जुलै १८४३ या दिवशी झाले. वैद्यकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर आरंभी ते आपला व्यवसाय ॲलोपॅथी या वैद्यकपद्धतीला अनुसरून करत होते. या पद्धतीने उपचार करत असतांना त्यामधूनच त्यांना होमिओपॅथीचे तत्त्व स्फुरले.

डॉ. सॅम्युएल हानेमान

१. ‘होमिओपॅथी’ या नावाचा अर्थ

‘होमिओपॅथी’ हे नाव ग्रीक भाषेतील आहे. ‘होमिऑस’ म्हणजे ‘लाईक’ आणि ‘पॅथॉस’ म्हणजे ‘फिलींग’, असा याचा इंग्रजीमध्ये अर्थ आहे. लॅटीन भाषेत ‘सिमिलिआ सिमिलिबस् क्यूरांटर’ किंवा इंग्रजीमध्ये ‘लाईक्स आर् क्युअर्ड बाय लाईक्स’, म्हणजेच ‘व्याधी लक्षणांशी समान असणारी औषधे व्याधींचा परिहार करतात. या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे.

२. डॉ. हानेमान यांनी लावलेला होमिओपॅथीचा शोध !

२ अ. ‘रोगांमध्ये निरनिराळ्या लक्षणांसाठी औषधीमिश्रण देण्याचा प्रघात असतांना हिवतापामध्ये मात्र एकच औषध पुरेसे होते’, याविषयी हानेमान यांना प्रश्न पडणे : व्यवसाय करत असतांना डॉ. हानेमान यांच्या असे लक्षात आले, ‘आपल्याकडे प्रतिदिन निरनिराळ्या व्याधी असलेले रुग्ण येतात. आपण त्यांची परीक्षा करतो. रोगाचे निदान करतो आणि त्यांची मुख्य लक्षणे विचारांत घेऊन त्यांवर निरनिराळ्या औषधांची योजना करून त्या सर्व औषधांचे मिश्रण करून देतो. असा नेहमीचा क्रम आहे; परंतु ‘मलेरिया’चा (हिवतापाचा) रोगी आला असतांना जरी तापाबरोबर इतर निरनिराळी लक्षणे असली, तरी त्या लक्षणांसाठी निरनिराळी औषधे योजून मिश्रण न करता केवळ ‘क्विनाइन’ हेच औषध देण्याचा प्रघात आहे. या एकाच औषधाने रुग्णाचा हिवताप बरा होऊन अन्य लक्षणांचाही परिहार होतो. इतर रोगांमध्ये निरनिराळ्या लक्षणांसाठी मिश्रण देण्याची आवश्यकता असतांना हिवतापामध्ये मात्र एकच औषध द्यावे लागते. असे का ?’, असा प्रश्न डॉ. हानेमान यांना पडला.

होमिओपॅथी औषधाचे प्रातिनिधीक छायाचित्र

२ आ. विचारांती औषधाच्या गुणधर्र्मांचे पूर्ण ज्ञान करून घेऊन औषध देणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. हानेमान यांच्या लक्षात येणे : विचारांती डॉ. हानेमान यांच्या लक्षात आले, ‘औषधांच्या गुणधर्मांचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे मिश्रणांची आवश्यकता भासते. आपल्याला कळलेले औषधांचे गुणधर्म हे एकतर पूर्वापार दंतकथेने चालत आलेले असतात. त्याचप्रमाणे मानवाला त्याच्या रोगावस्थेमध्ये कोणतेही औषध देऊन त्यापासून होणारे हितकर किंवा अहितकर परिणाम अजमावून पाहिले जातात. ‘हे गुणधर्म, आकस्मित प्रसंगाने मानवावर घडलेल्या परिणामांपासून कळलेले औषधांचे गुणधर्म, तसेच प्राण्यांवर प्रयोग करून कळलेले औषधांचे गुणधर्म’, अशा पद्धतींनी आपल्याला कळले आहेत. हे ज्ञान परिपूर्ण नसल्यामुळे रोग्याला उपयोगी पडेल, असे एकच औषध न देता मिश्रण देण्याची आवश्यकता पडत आहे. याचा अर्थ ‘आपल्याला कळलेले औषधांचे गुणधर्म हे अपूर्ण असून याविषयी पूर्ण ज्ञान करून घेणे अत्यावश्यक आहे.’

२ इ. औषधाचे पूर्ण गुणधर्म जाणून घेण्याकरता ‘ते औषध निरोगी माणसावर प्रमाणसिद्ध करून पाहिले पाहिजे’, याविषयी डॉ. हानेमान यांची निश्चिती होणे : हानेमान यांनी वैद्यक शास्त्रावरील त्या वेळचे सर्व ग्रंथ वाचून पाहिले; परंतु त्यांना मनाला पटेल, असे समाधानकारक योग्य तत्त्व आणि रीत दिसली नाही. त्यामुळे त्या जुन्या औषध प्रक्रियेवरील त्यांचा विश्वास नाहीसा झाला आणि ते नवीन तत्त्वाच्या शोधाकडे वळले. एक दिवस डॉ. कल्लेन यांच्या ‘मटेरिया मेडीका’चे (औषधी गुणदर्शन) जर्मन भाषेमध्ये भाषांतर करत असतांना त्यांचे लक्ष कल्लेन यांनी लिहिलेल्या ‘सिंकोना’ या झाडाच्या सालीच्या गुणधर्माने वेधून घेतले. त्यांनी असे लिहिले आहे, ‘सिंकोनाच्या सालीने विषमज्वर बरा होतो खरा; पण चांगली प्रकृती असलेल्या आणि ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल अधिक प्रमाणात खाल्यास त्याला हिमज्वरासारखा ताप येतो.’ हे वाचल्यानंतर हानेमान यांनी याचा अनुभव घेऊन निश्चिती करून घेण्याचे ठरवले आणि सिंकोनाची साल स्वतः खाऊन अनुभव घेतला. त्या वेळी त्यांना हिमज्वरासारखा ताप आला. त्यांनी होणार्‍या शारीरिक आणि मानसिक परिणामांच्या लक्षणांचीही नोंद केली. त्या वेळी ती लक्षणे वरवर ठाऊक असलेल्या त्या औषधाच्या गुणधर्मांच्या संख्येपेक्षा पुष्कळ पटींनी अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे औषधाचे पूर्ण गुणधर्म जाणून घेण्याकरता ‘ते औषध निरोगी माणसावर प्रमाणसिद्ध (प्रूव्ह) करून पाहिले पाहिजे’, असे त्यांच्या लक्षात आले.

२ ई. अनेक प्रयोगांती डॉ. हानेमान यांनी वर्ष १७९० मध्ये ‘एकाच औषधाने रोगाची पुष्कळशी लक्षणे बरी करता येतात’, असे होमिओपॅथीचे तत्त्व प्रसिद्ध करणे : इतक्यानेही पूर्णनिश्चिती न होता त्यांनी आणखी एकदा आपल्यावर आणि आपल्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन निश्चिती केली. त्यानंतर ‘ॲकोनाईट, बेलाडोना, नक्सव्हॉमिका, आर्सेनिकम, मर्क्युरी, सल्फर’ इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन ती औषधे सूक्ष्म प्रमाणात रुग्णांस दिली. रुग्णांना चांगला गुण आलेला पाहून स्वतःच्या मनाची निश्चिती झाल्यानंतर वर्ष १७९० मध्ये त्यांनी या पॅथीचे तत्त्व प्रसिद्ध केले. रोगलक्षणांत आणि औषधीलक्षणांत जी समानता दिसून येते, त्या समानतेमुळेच ‘एकाच औषधाने रोगाची पुष्कळशी लक्षणे बरी करण्यात येतात’, हे यातील मर्म आहे.

३. होमिओपॅथीची मूलभूत तत्त्वे

‘समानलक्षण योजना’ हे होमिओपॅथीचे मूळ तत्त्व आहे, म्हणजे एखादा पदार्थ खाण्यात आल्यानंतर जी काही लक्षणे उद्भवतील, तशीच लक्षणे अन्य कोणत्याही कारणांमुळे रुग्णामध्ये उद्भवली असतील, त्या वेळी ‘तो पदार्थ औषध म्हणून देणे’, याला ‘समलक्षण योजना’, असे म्हटले आहे. या नैसर्गिक नियमाच्या पायावरच होमिओपॅथीच्या चिकित्साशास्त्राची इमारत रचली आहे. (Homoeopathy is the science of therapeutics based upon Natures Law of Cure – Similia Similibus Curantur)

डॉ. हानेमान यांनी सांगितलेली ५ मूलतत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. लक्षणांच्या योगाने रोग स्पष्टपणे व्यक्त होतो.

आ. कोणत्याही औषधाच्या क्रियेचे ज्ञान हे त्या औषधाचा निरोगी माणसावर प्रयोग करून आणि त्याचे निरीक्षण करून झाले पाहिजे.

इ. औषध आणि रोग या दोहोंमध्ये एकाने दुसर्‍याला बरे करण्याचा जो संबंध दिसून येतो, तो समान तत्त्वाच्या नियमाच्या बळाने घडून आलेला असतो.

ई. निवडलेले औषध इतर कोणत्याही औषधांबरोबर न मिसळता स्वतंत्रपणे दिले पाहिजे.

उ. रोग बरा करण्यासाठी आवश्यक असेल, तेवढाच औषधाचा अत्यल्प भाग रुग्णाला देण्यात यावा.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

४. डॉ. हानेमान यांनी होमिओपॅथीची औषधे प्रमाणसिद्ध (प्रूव्ह) करतांना त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात आणलेली पद्धत

४ अ. निरोगी माणसांना औषधे देऊन आणि त्याच्या परिणामांकडे लक्ष देऊन नंतर मत ठरवणे : पुष्कळ वर्षांच्या दीर्घ परिश्रमाने आणि चिंतनाने डॉ. हानेमान यांनी एक नवीन तत्त्व प्रतिपादन केले. ते असे, ‘औषधींच्या अंगी कोणते गुण आहेत ?’, हे समजण्यास ‘अमुकच एक मार्ग आहे’, असे नाही. औषधे रुग्णांस दिली असता ‘रोगनिवारण का आणि कसे होते ?’, याचे समर्पक उत्तर देता येत नाही. त्यामुळे गुणदोष ठरवतांना निरोगी माणसांना औषधे देऊन आणि त्याच्या परिणामांकडे लक्ष देऊन नंतर मत ठरवले पाहिजे.’

४ आ. व्यक्तीने औषधाचा मूलार्क पोटात घेऊन जाणवणार्‍या लक्षणांची नोंद करणे : डॉ. हानेमान निरोगी व्यक्तींना औषधाचा मूलार्क पोटात घेण्यास सांगत आणि त्या औषधाच्या प्रभावाखाली असेपर्यंत जी लक्षणे जाणवली, त्यांची शास्त्रशुद्ध नोंद करून ठेवण्यास सांगत.

४ इ. होमिओपॅथीच्या मूळ ग्रंथाची निर्मिती ! : निरोगी व्यक्तीच्या नोंदी पडताळून त्या माध्यमातून डॉ. हानेमान यांनी शुद्ध औषधी गुणधर्मांचे वर्णन करणार्‍या ‘मटेरिया मेडीका प्यूरा (विशुद्ध औषधी गुणधर्म विवरण)’, या होमिओपॅथीच्या मूळ ग्रंथाची निर्मिती केली. त्यांनी या ग्रंथाची रचना ६ भागांमध्ये केली आहे, तर ‘क्रॉनिक डिसीजेस’ (विलंबी रोग) या ग्रंथाची रचना ५ भागांमध्ये केलेली आहे. या ग्रंथांचा उपयोग करून त्यांनी समलक्षणतत्त्वाचा नियम प्रत्यक्ष उपयोगामध्ये आणला.

५. पोटेन्सीचा (शक्तीचा) उगम

५ अ. डॉ. हानेमान यांनी ‘रुग्णाला किती अल्प प्रमाणात औषध दिल्याने इष्ट परिणाम घडून येतो’, याचा अभ्यास करणे : डॉ. हानेमान यांनी ‘औषधी गुणधर्म’ हा ग्रंथ सिद्ध झाल्यानंतर त्या ग्रंथामधील लक्षणे आणि समानतत्त्वाच्या नियमाला अनुसरून रुग्णाला एकच औषध देण्यास आरंभ केला. प्रथम औषधे ही मूल अर्कामध्येच देण्यात येत होती. रुग्णाला औषध देतांना जरी ते एकच औषध देत होते, तरी त्या औषधाचे प्रमाण मात्र ‘ॲलोपॅथी’प्रमाणे जी पद्धत ठरवलेली होती, त्याप्रमाणे देत असत. त्या वेळी ‘रुग्णाला एकच औषध दिल्यानंतर त्याची रोगलक्षणे वाढून मूळ लक्षणांमध्ये वाढ होते आणि कालांतराने ती लक्षणे न्यून होत जाऊन तो रोगी बरा होतो’, असे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर रोग बरा झाला पाहिजे; परंतु त्याच वेळी ‘लक्षणांचा जो असह्य असा प्रकोप होतो, तो न होण्यासाठी काय करायला पाहिजे ?’, असा विचार करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी ते ‘एकच औषध अल्प प्रमाणामध्ये देऊन त्याचा काय परिणाम होतो ?’, ते पहाण्यास आरंभ केला. त्या वेळी ‘अल्प प्रमाणामध्ये औषध दिल्याने लक्षणांमध्ये वाढ न होता इष्ट परिणाम घडून येत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. औषधाचे प्रमाण न्यून करता करता ते मूलार्काच्या एका थेंबापर्यंत आले, तरीसुद्धा ‘औषधाचे इष्ट कार्य होतच आहे’, असे त्यांना दिसून आले. त्या वेळी ‘याहीपेक्षा अल्प प्रमाणामध्ये औषध का देऊ नये ?’ आणि ‘असे प्रमाण आपण कुठपर्यंत न्यून करू शकतो ?’ अन् तसे केले असता ‘त्यामध्ये मूळ औषधाचा अंश किती असेल आणि तो इष्ट ते कार्य करील का ?’, असे विचार त्यांच्या मनामध्ये आले.

५ आ. वस्तूचे विघटन झाले, तरी तिचे मूळ गुणधर्म नष्ट होत नसून मूल औषधाचे घर्षण अथवा खल (दुधाची साखर, मद्यार्क यांबरोबर औषधाचे विशिष्ट प्रकारे घर्षण करणे) झाला, तरी त्याचे तेज वाढण्यास साहाय्य होते ! : विचार करत असतांना त्यांच्या असे लक्षात आले की, या जगामध्ये कोणत्याही वस्तूचा नाश होतच नाही. वस्तूचे कितीही विघटन केले अथवा ती रूपांतरित केली आणि जरी ती डोळ्यांना अथवा सूक्ष्मदर्शक यंत्रालाही दिसत नसली, तरी ‘तिचा नाश झाला’, असे होत नाही. त्यामुळे प्रवाही स्थितीमधील औषधाचा एक थेंब घेऊन किंवा घन स्थितीमधील औषधाचा एक दाणा किंवा कण (ग्रेन) घेऊन तो विभाजित केला, तर त्यामुळे मूळ औषधाचा नाश होणार नाही. त्याचप्रमाणे घर्षणाच्या किंवा खलाच्या योगाने औषधाचे तेज अधिकच वाढेल. त्यासाठी दुधाची साखर, मद्यार्क (अल्कोहोल) आदी तटस्थ स्थितीमधील पदार्थ घेऊन त्यांच्याबरोबर मूल औषधाचे घर्षण अथवा खल झाला, तर त्यामुळे मूळ औषधाचे तेज वाढण्यास साहाय्य होईल (औषधाची सूक्ष्म शक्ती कार्यरत होईल.) !

५ इ. डॉ. हानेमान यांनी रोगाबरोबर संघर्ष करण्यासाठी अतिसूक्ष्म रूपामध्ये ‘पोटेन्सी’च्या माध्यमातून औषधांची निर्मिती करणे : शरीररचनेचा विचार केला असता शरीर हे सहस्रो पिंडांच्या (‘सेल्स’च्या) समूहाने बनले आहे. पिंड हा ‘प्रोटोप्लाझम’ (Protos + Plasma = First form) पासून बनलेला आहे. त्यावरून त्याला ‘मूलद्रव्य’ असे म्हणतात. ‘या पिंडामध्ये जन्म-मरण, वाढ आणि गती या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे चालू असतात, म्हणजे शरिरामध्ये सर्व गोष्टी या सूक्ष्मातूनच चालू आहेत अन् या सूक्ष्माबरोबर संघर्ष करण्याकरता सूक्ष्मच आवश्यक आहे’, असा विचार करून डॉ. हानेमान यांनी रोगाबरोबर संघर्ष करण्यासाठी अतिसूक्ष्म रूपामध्ये ‘पोटेन्सी’च्या माध्यमातून औषधांची निर्मिती केली. या पद्धतीने ही पॅथी उदयास आली.

ही पॅथी अल्प खर्चिक असून सर्वसामान्यांना परवडणारी आहे. या पॅथीमुळे पुष्कळसे आजार शस्त्रक्रियेविना बरे केले जातात.’

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (६.२.२०२४)