‘२५.५.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरा याग’ झाला. त्या वेळी मला श्री प्रत्यंगिरादेवीची विविध रूपे दिसली. ही रूपे एकाच दिवशी न दिसता ती मला वेगवेगळ्या दिवशी दिसली. प्रथम मला तिचे तारक रूप, नंतर मारक आणि त्यानंतर मारक-तारक रूप दिसले.
देवीने मारक रूपातून तारक रूप धारण केले. त्या वेळी सूक्ष्मातून झालेली प्रक्रिया साधकांना कळावी, यासाठी मी येथे दिनांकानुसार क्रम न घेता सूक्ष्मातील प्रक्रियेनुसार, म्हणजे प्रथम ‘मारक रूप’, नंतर ‘मारक-तारक रूप’ आणि त्यानंतर ‘तारक रूप’ या क्रमाने सूत्रे घेतली आहेत.’ – एक साधिका
१. प्रत्यंगिरा यागाचे सूक्ष्मातील परीक्षण करतांना आध्यात्मिक त्रास वाढणे
‘२५.५.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरा याग’ होता. या यागाचे सूक्ष्मातील परीक्षण करतांना माझा आध्यात्मिक त्रास वाढल्याने मला बरे वाटत नव्हते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तू यागाचे सूक्ष्मातील परीक्षण करण्याची सेवा करत असल्याने तुझ्यावर वाईट शक्तींचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे परीक्षणाला आरंभ करण्यापूर्वी तू ३० मिनिटे नामजप कर.’’
२. आरंभी देवीचे रूप दिसल्यावर ‘ते प्रत्यंगिरादेवीचे रूप आहे’, असे वाटणे आणि नंतर ‘वाईट शक्तीने देवीचे मायावी रूप धारण केले आहे’, हे लक्षात येणे
आरंभी मला देवीचे रूप दिसले. त्या वेळी मला ‘प्रत्यंगिरादेवीचेच रूप दिसत आहे’, असे वाटत होते; मात्र काही वेळाने ‘ती प्रत्यंगिरादेवी नसून वाईट शक्तीने देवीचे मायावी रूप धारण केले आहे’, हे माझ्या लक्षात आले. मला सूक्ष्मातून दिसलेल्या या दृश्याचे मी चित्र रेखाटले आणि चित्रातून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होऊ नये, यासाठी मी चित्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले.
३. वाईट शक्तीने धारण केलेल्या देवीच्या मायावी रूपाचे चित्र रेखाटत असतांना वाईट शक्तींकडून मिळालेले चुकीचे ज्ञान
अ. प्रत्यंगिरादेवी ही एक शक्ती आहे आणि ती कोणतेही रूप धारण करू शकते. देवीच्या सभोवती राखाडी रंगाचा धूर आहे. धुरामुळे देवीचे पूर्ण रूप दिसत नाही.
आ. देवी स्वतःचे पूर्ण रूप दाखवत नाही. देवी स्वतःचे रूप पालटण्याच्या स्थितीत असून तिचे केवळ डोळेच दिसत आहेत.
इ. देवी मारक रूपात आहे.
४. देवीचे रूप दिसत असतांना वीज चमकल्याप्रमाणे लख्ख प्रकाश दिसणे आणि त्याच वेळी ‘श्री प्रत्यंगिरादेवी कशी प्रगट होते ?’, याची ध्वनीचित्रफीत दाखवली जाणे
देवीच्या मायावी रूपाचे चित्र रेखाटत असतांना मला वातावरणात अंधार जाणवला आणि ज्या ठिकाणी देवीचे रूप दिसत होते, तिथे वीज चमकल्याप्रमाणे लख्ख प्रकाश दिसला. मला मायावी वीज चमकतांना दिसली, त्याच वेळी सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी प्रत्यंगिरादेवीची माहिती सांगतांना ‘प्रत्यंगिरादेवी कशी प्रगट होते ?’, याविषयीची मोठ्या पडद्यावर (‘प्रोजेक्टर’वर) ध्वनीचित्रफीत दाखवली. त्यातही ‘प्रथम अशीच वीज चमकते आणि प्रत्यंगिरादेवी प्रगट होते’, असे दाखवले.
५. देवाला प्रार्थना केल्यावर आध्यात्मिक त्रास न्यून होऊन रात्री प्रत्यंगिरादेवीच्या मूळ रूपाचे दर्शन होणे
प्रत्यंगिरायाग चालू झाल्यावर मला प्रत्यंगिरादेवीचे जे रूप दिसले, ते तिचे मूळ रूप नव्हते, तर वाईट शक्तीने धारण केलेले मायावी रूप होते. त्या वेळी ‘देव मला सूक्ष्मातील जे दृश्य दाखवत आहे, त्यात वाईट शक्ती अडथळे आणत आहे’, असे मला जाणवले. मी शरणागतभावाने देवाला प्रार्थना केली, ‘समष्टीच्या दृष्टीने योग्य असे सूक्ष्मातील दृश्य तू मला दाखव.’ त्यानंतर याग संपल्यावर रात्री ११.५५ वाजता काही प्रमाणात माझा आध्यात्मिक त्रास उणावला आणि मला प्रत्यंगिरादेवीच्या मूळ रूपाचे दर्शन झाले. प्रत्यंगिरादेवी गर्जना करत होती आणि तिच्याभोवती ज्वाला होत्या. यागाच्या वेळी देव मला प्रत्यंगिरादेवीचे हेच रूप दाखवत होता.’
– एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के )
६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशी साधिकेला श्री प्रत्यंगिरादेवीचे मारक रूप दिसणे

१. ‘२५.५.२०२२ या दिवशी ‘प्रत्यंगिरा याग’ संपल्यानंतर रात्री ११.५५ वाजता मला सिंहमुख असलेल्या श्री प्रत्यंगिरादेवीचे दर्शन झाले. ती देवी गर्जना करत होती.
२. गर्जना करतांना देवीने मुख उघडले की, आकाशतत्त्व कार्यरत होत होते आणि वाईट शक्ती तिच्या मुखात खेचल्या जाऊन नष्ट होत होत्या.
३. प्रत्यंगिरादेवीच्या भोवती अग्नीच्या ज्वाळा होत्या. या ज्वाळांनी देवी वाईट शक्ती, तसेच साधकांभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट करत होती.
४. प्रत्यंगिरादेवीची जिव्हा बाहेर आलेली होती आणि ही देवीची एक मुद्राच होती. या माध्यमातून देवी वाईट शक्तींमध्ये भय निर्माण करून त्यांना नष्ट करत होती.
५. हे प्रत्यंगिरादेवीचे सौम्य मारक रूप आहे. ती यापेक्षाही अधिक मारक रूपात असते.
अनुभूती
अ. मी प्रत्यंगिरादेवीचे मुख आणि घसा रेखाटत असतांना ‘मी देवीच्या मुखात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवत होते.
आ. मी चित्रात अग्नीच्या ज्वाळा रेखाटत असतांना मला त्या ज्वाळांचा आवाज ऐकू येत होता.
इ. मला प्रत्यंगिरादेवीच्या गर्जनाही ऐकू येत होत्या.
ई. प्रत्यंगिरादेवी मारक रूपात होती, तरी मला तिचे रूप लोभस दिसत होते आणि तिच्याविषयी प्रेम वाटत होते.’
– एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के )
|