महाकुंभपर्वामध्ये भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी संतांनी आवाज उठवला. बॅनर लावणे, पदयात्रा काढणे, सभा घेणे, हिंदु राष्ट्र लिहिलेले ध्वज फडकवणे, हिंदु राष्ट्रासाठीच्या राज्यघटनेचे प्रारूप घोषित करणे, हिंदु राष्ट्राच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणे, पत्रकार परिषद घेणे अशा प्रकारे विविध आध्यात्मिक संस्था आणि आखाडे यांनी हिंदु राष्ट्रासाठी आवाज उठवला. येत्या काळात याचे पडसाद सर्वत्र उमटतील आणि हिंदु राष्ट्राची मागणी अधिक प्रबळ होईल. ही संकल्पना ज्यांच्या लेखणीतून उतरली, ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि जे वृत्तपत्र ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…’ हे ब्रीदवाक्य धारण करून पत्रकारिता करत आहे, ते ‘सनातन प्रभात’ ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्राची संकल्पना ‘सनातन प्रभात’ने हिंदु समाजापर्यंत कशी पोचवली आणि तिचा काय परिणाम झाला ? हे या लेखाद्वारे समजून घेऊ !
कथित धर्मनिरपेक्ष संकल्पनेला सुरूंग लावून हिंदु राष्ट्राचे बीज रोवले !
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ या ब्रीदवाक्याने दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाला, तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, याचे साम्यवादी आणि पुरोगामी मंडळी यांनी अवडंबर माजवले होते. ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन’ जणू अशी समाजभावना जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली. वर्षानुवर्षे कथित सर्वधर्मसमभावाच्या प्रभावाखाली असलेल्या हिंदु समाजातील मोठ्या वर्गालाही ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना धर्मांध वाटत होती. धर्मप्रेमी हिंदूंनाही ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या विरोधात वाटत होते. हिंदु राष्ट्राचा पुरस्कार म्हणजे राज्यघटनाविरोधी, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे हिंदु राष्ट्राची संकल्पना दृढ करण्यासाठी प्रथम कथित धर्मनिरपेक्षतेचे बिंग फोडणे आवश्यक होते. या कथित धर्मनिरपेक्षतेची चिरफाड दैनिक ‘सनातन प्रभात’ अगदी व्यवस्थितपणे केली. यामुळे हिंदुविरोधी शक्तींच्या आणि विशेषत: राज्यघटनेविरोधाच्या भयाने दबक्या आवाजात हिंदु राष्ट्राचा उच्चार करणारा हिंदु समाज उघडपणे हिंदु राष्ट्राची मागणी करू लागला. हिंदूंमधील हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ने केले.
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (वार्ताहर)
हिंदु राष्ट्राची संकल्पना सर्वप्रथम मांडणारे वृत्तपत्र !

ज्या वेळी ‘हिंदु राष्ट्र’ शब्द उच्चारणे धर्मांध, कट्टरतावाद आणि राज्यघटनाविरोधी मानले जात होते. कथित पुरोगामी आणि हिंदुविरोधी शक्ती ‘हिंदु राष्ट्र’ शब्द उच्चारल्यावर तुटून पडत होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९८५ मध्ये रामराज्यावर आधारित हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली. ती दृढ करण्यासाठी त्यांनी ‘सनातन प्रभात’ वृत्तपत्र चालू केले. तेव्हापासूनच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ या ब्रीदवाक्यासह दैनिक ‘सनातन प्रभात’ कार्यरत आहे. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे व्रत आहे.
‘हिंदू बहुसंख्य असणे’ म्हणजे हिंदु राष्ट्र नव्हे !
हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची भावना निर्माण करण्याचा सनातन प्रभातने गाठला; परंतु अनेक हिंदूंमध्ये अद्यापही हिंदु राष्ट्राविषयी स्पष्टता नाही. राजकीय पक्षांशी जोडलेल्या हिंदूंना हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असणे म्हणजे हिंदु राष्ट्र वाटते. काहींना वाटते, ‘हिंदु बहुसंख्य असणे म्हणजे हिंदु राष्ट्र’, तर काहींना ‘राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे म्हणजे हिंदु राष्ट्र’ वाटते. यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहेही; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रामराज्यावर आधारित आदर्श राज्यकारभार, प्रजेवर पितृवत् प्रेम करणारी, धर्माचरण करणारी हिंदु राष्ट्राची शाश्वत संकल्पना मांडली. हिंदु राष्ट्राची ही व्यापक संकल्पना सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे.
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची संकल्पना पोचवण्याचे शिवधनुष्य !
सद्यस्थितीत अनेकजण स्वत:ला ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवतात; मात्र हिंदु धर्मानुसार आचरण करत नाहीत. छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगतात; मात्र त्यांच्याप्रमाणे आदर्श राज्यकारभार न करता भ्रष्टमार्गाने संपत्ती मिळतात. हिंदुत्वाचा उपयोग जे केवळ स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करतात, अशी मंडळी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देऊ शकत नाहीत. उलट अशा स्वार्थी लोकांमुळे हिंदुत्वाची अपकीर्ती होते. हिंदु धर्म त्यागावर आधारित आहे. राष्ट्र-धर्मासाठी त्याग करणारेच आदर्श राष्ट्रनिर्मिती करू शकतात. ही वस्तुस्थिती हिंदूपर्यंत पोचवण्याचे कार्य सनातन प्रभात करत आहे.
व्रतस्थ पत्रकारिता जिवंत आहे !
यापूर्वी पत्रकारिता हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम होते. पत्रकार हे समाज, राष्ट्र यांप्रती बांधिलकी म्हणून वृत्तपत्र चालवत होते; मात्र सध्याची पत्रकारिता पूर्णत: व्यावसायिकतेकडे झुकली आहे. सामाजिक बांधिलकीतून वृत्तपत्र चालवणारे आणि पत्रकारिता करणारे औषधालाही सापडणे कठीण आहे. अशा काळात दैनिक ‘सनातन प्रभात’ सेवाभावी वृत्तीने चालवणे, याविषयी अनेकांना आश्चर्य वाटते. दैनिक ‘सनातन प्रभात’चे संपादक, संरचनाकार, वार्ताहर, वितरक राष्ट्र-धर्म कार्यासाठी सेवा म्हणून हे कार्य करत आहेत. व्रतस्थ राहून वृत्तपत्र चालवणे हे उदाहरण क्वचितच आढळेल.
येत्या काळात ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राची लाट निर्माण करील !
ज्याप्रमाणे मोगलांचे अधिपत्य असतांना छत्रपती शिवरायांनी ही ‘श्रीं’ची इच्छा मानून हिंदवी स्वराज्य निर्मिले, त्याप्रमाणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणे, तीव्र विरोधानंतरही निर्धाराने ही संकल्पना पुढे नेणे दैवी आहे. अन्य वृत्तपत्रांच्या तुलनेत दैनिक ‘सनातन प्रभात’ छोटे आहे; परंतु ज्याप्रमाणे कडेकपार्यांतून पाझरणारा छोटासा झरा नदीचे रूप धारण करून विशाल सागरात समाविष्ट होतो. त्याप्रमाणे येत्या काळात ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राची लाट निर्माण करील !
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (वार्ताहर)