शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करून साधनेतील आनंद अनुभवणार्‍या ढवळी, फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) रूपाली अरविंद कुलकर्णी (वय ४१ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण चतुर्थी (१८.३.२०२५) या दिवशी सुश्री (कु.) रूपाली अरविंद कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. रूपाली कुलकर्णी

सुश्री (कु.) रूपाली अरविंद कुलकर्णी यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘११.५.२०२४ या दिवशी मला सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्याचे समजले आणि मला पुष्कळ आनंद झाला. मी वर्ष २००३ पासून रूपालीला ओळखते. मला पूर्वीची आणि आताची रूपाली आठवू लागली. मला रूपाली करत असलेले प्रयत्न, तिला येणार्‍या अडचणींवर तिने उत्तरदायी साधिकांशी बोलून त्यांवर केलेली मात, याविषयीचे सर्व प्रसंग आठवले. ‘प्रत्येकाची वेळ आली की, देव योग्य ते त्याला देतो. आपण करत रहायचे’, हे तिच्या उदाहरणावरून माझ्या लक्षात आले. रूपाली हिची माझ्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. साधक आणि संत यांचे मार्गदर्शन घेऊन प्रयत्न केल्यावर सकारात्मकतेत वाढ होणे 

‘रूपालीला पूर्वी घडलेल्या काही प्रसंगांची आठवण होऊन निराशा येत असे. त्यामुळे ती नवीन सेवा शिकायला सिद्ध होत नसे किंवा दायित्व घेऊन सेवा करत नसे. नंतर तिने साधक आणि संत यांचे मार्गदर्शन घेऊन ते सांगतील, तसे प्रयत्न करण्यास आरंभ केला आणि तिच्यातील सकारात्मकतेत वाढ झाली.

सौ. अरुणा तावडे

२. संतांच्या समवेत बसून संगणकीय धारिकांचे वाचन करण्याची सेवा मिळणे आणि संतसंगत अन् सेवा यांतील आनंद अनुभवता येणे  

रूपालीला होणार्‍या शारीरिक त्रासांमुळेही ती अतिशय हतबल झाली होती. त्याच काळात तिला एका संतांच्या समवेत बसून संगणकीय धारिकांचे वाचन करण्याची सेवा मिळाली आणि जणू काही तिचे तीव्र प्रारब्ध संपण्यास आरंभ झाला. तिला ही सेवा करण्यासही प्रथम अतिशय भीती वाटत असे; परंतु हळूहळू तिची भीती न्यून झाली आणि तिची सेवा चांगली होऊ लागली. तिला संतसंगत आणि सेवा यांतील आनंद अनुभवता येऊन तिच्या जीवनात आमूलाग्र पालट होऊ लागले.

३. रूपालीची साधना करण्याची तळमळ  

मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी रूपालीची साधनेची धडपड, भाग्याने संतसेवा मिळून या सेवेचे सोने करण्याची तिची तळमळ, सेवेतील चुकांतून होणार्‍या संघर्षावर मात करणे आणि पुन्हा चिकाटीने प्रयत्नरत रहाणे, संतांचे आज्ञापालन करणे, आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय करून आणि मानसिक त्रासांवर स्वयंसूचना घेणे, व्यष्टी आणि समष्टी साधना यांची घडी बसवणे इत्यादी तिने केलेले प्रयत्न मी जवळून पाहिले आहेत. रूपालीमध्ये क्षात्रभाव असल्याने ती स्वभावदोषांवर मात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करते.

४. आई-वडिलांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणे  

कु. रूपालीला स्वतःला शारीरिक त्रास आहेच; पण त्याच समवेत तिचे आई-वडीलही वयस्कर असल्याने त्यांच्याही बर्‍याच सेवा तिला कराव्या लागतात. स्वतःला त्रास होत असतांना इतरांचे करणे कठीण असते; पण ही सेवाही ती चांगल्या प्रकारे करत आहे. ‘‘आई-वडिलांची सेवा ‘संतसेवा’, असा भाव ठेवून करायची’’, असे तिला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. ‘इतर साधकांची सेवा ‘संतसेवा’ म्हणून करणे एकवेळ सोपे जाईल; पण कुटुंबियांची सेवा ‘संतसेवा’ म्हणून करणे आरंभी कठीण जाईल’, असे मला वाटले; पण यावरही ती मात करत सेवारत आहे.

५. तत्त्वनिष्ठ  

रूपाली मानसिक स्तरावर न रहाता अधिकाधिक आध्यात्मिक स्तरावर असते. इतरांच्या चुकाही ती तत्त्वनिष्ठ राहून सांगते.

६. रूपालीमध्ये जाणवलेले पालट 

६ अ. रागाचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी तिला एखाद्या गोष्टीचा पुष्कळ राग येत असे. आता तिला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. तिला राग आल्यास त्याची तिला लगेच जाणीव होते. नंतर ती क्षमायाचनाही करते.

६ आ. पूर्वीपेक्षा अंतर्मुखता वाढली आहे. 

मला कु. रूपालीसारखी मैत्रीण मिळाल्यामुळे मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘तिच्यामधील गुण माझ्यात येऊन माझेही साधनेतील प्रयत्न वाढू देत आणि श्री गुरूंना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होऊ दे’, हीच श्री गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. अरुणा अजित तावडे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.