बारामती (पुणे) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेच्या निमित्ताने सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१२.२.२०२५ या दिवशी बारामती (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. सभेच्या प्रचाराच्या सिद्धतेपासून सभा संपेपर्यंतच्या कालावधीत बारामती येथील सौ. प्राजक्ता सांगळुदकर यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. प्राजक्ता सांगळुदकर

१. जिज्ञासूने दिलेल्या प्रतिसादावरून ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे आयोजन करण्यात येणे

‘बारामती येथे ‘साधना’ या विषयावर प्रवचन घ्यायचे ठरले होते. प्रवचनाचे निमंत्रण प्रथम ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांना देण्याचा निर्णय झाला होता. निमंत्रण देत असतांना एक वर्गणीदार म्हणाले, ‘‘तुम्ही धर्म आणि राष्ट्र यांवर होणार्‍या आघातांची माहिती देणारा कार्यक्रम घ्या. आज त्याचीच आवश्यकता आहे. तेच सर्वांना अधिक आवडेल आणि समजेलही.’’ त्यानंतर बारामतीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा घ्यायचे ठरले. गुरुकृपेने सभा आयोजनाचे मोठे दायित्व मला आणि एका सहसाधिकेला मिळाले.

२. सभेच्या आयोजनासाठी साधकांनी भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न

२ अ. ‘चैतन्याची उधळण करत आहोत’, असा भाव ठेवून साधकांनी प्रचार करणे आणि जिज्ञासूंनीही उत्तम प्रतिसाद देणे : ‘आपण महाकुंभमेळ्यात जात आहोत. सभेच्या माध्यमातून आपण समाजात गुरुदेवांच्या चैतन्याची उधळण करणार आहोत. सर्वांच्या देहाची आणि मनाची शुद्धी होत आहे’, असा भाव ठेवून साधकांनी सभेचा प्रचार केला. परिणामी जिज्ञासूंचाही उत्तम प्रतिसाद लाभला. काही जण दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. सर्व साधकांनी खूप तळमळीने आणि भावपूर्ण प्रसार केला. केवळ तीन आठवड्यांतच आम्ही सहस्रो लोकांपर्यंत पोचलो. काही कारणांमुळे घराबाहेर जाऊन सेवा करू न शकणार्‍या साधकांनी जिज्ञासूंना संपर्क करून सभेची माहिती देण्याची सेवा केली. सभेच्या दिवशी साधकांनी ‘सभेत अडथळे येऊ नयेत’, यासाठी वरचेवर श्रीकृष्णाला प्रार्थना केली. शहरात हिंदुत्वासाठी प्रतिकूल परिस्थिती असतांनाही प्रत्यक्ष सभेला १५० धर्मप्रेमी उपस्थित राहिले.

२ आ. प्रत्यक्ष सभेच्या दिवशी ‘जणू धर्मप्रेमींचे ‘अमृत स्नान’च होणार आहे’, असा भाव ठेवणे : सभेच्या दिवशी महाकुंभमेळ्यात ‘अमृत स्नान’ होते. सर्वसाधकांनी भाव ठेवला, ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा हेच महाकुंभ आहे. सभेला उपस्थित रहाणारे धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू यांचे ‘अमृत स्नान’च होणार आहे. श्री महादेव चैतन्याची आणि अमृताची उधळण करणार आहे. सर्व जिज्ञासू सकारात्मक होतील.’

३. सभेला आरंभ होण्यापूर्वी साधिकेचा भाव जागृत होणे  

सभा सुरू होण्यापूर्वी मला ‘व्यासपिठावर प्रत्यक्ष भगवान महादेव जटा सोडून तांडव नृत्य करत आहे आणि महादेवाचे मारक तत्त्व जागृत झाले आहे’, असे दृश्य दिसले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

४. वीजपुरवठा खंडित होऊनही सभा निर्विघ्नपणे पार पडणे  

सभा चालू झाल्यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आता कसे होईल ? सर्वांपर्यंत आवाज पोचणार नाही. काही जण उठून जातील का ? हिंदुत्वनिष्ठांचा उत्साह न्यून होईल का ?’ त्या वेळी सभेला उपस्थित धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘ध्वनीवर्धक नसला, तरी चालेल. आम्हाला तुमचा आवाज ऐकू येतो. तुम्ही बोला.’’ सभेतील मुख्य वक्त्यांचे मार्गदर्शन सर्वांनी एकाग्रतेने ऐकले. सुमारे २० मिनिटांनी वीजप्रवाह सुरळीत झाला. सभेनंतर जिज्ञासूंची बैठकही पार पडली.

५. ‘प्रतिकूल परिस्थितीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा होणे, ही हिंदु राष्ट्राची नांदीच !’, असे साधिकेला वाटणे  

‘केवळ गुरुदेवांच्या आणि संतांच्या कृपेमुळेच बारामतीतील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा निर्विघ्नपणे पार पडली. प्रतिकूल परिस्थितीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा होणे, ही गोष्ट हिंदु राष्ट्र येण्याची नांदीच आहे’, असे मला वाटले. या सभेच्या आयोजनाची सेवा गुरुदेवांनीच माझ्याकडून करून घेतली, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सौ. प्राजक्ता सांगळुदकर, बारामती, जिल्हा पुणे. (१४.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक