
मुंबई – सांगलीतील खानापूर येथील शिवसेना आमदार सुहास बाबर आणि सांगलीतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी विधानसभा सभागृहात मागणी केली. या मागणीविषयी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी उपकेंद्रासाठी १४१ कोटी रुपयांचा निधी लागेल. जिल्ह्याधिकार्यांनी जागेसाठी अनुमती दिली आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उपकेंद्रासाठी प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगितले.
आमदार पडळकर यांनी सांगितले की, सांगलीतील खानापूर, कवठेमहांकाळ हा भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी दूरवर जावे लागते. हा भाग आतापर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. या भागाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी याविषयी सभागृहात घोषणा करावी.