‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कलियुगाला अनुसरून साधकांच्या जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची निर्मिती केली. त्याची गुरुकृपेमुळे माझ्या लक्षात आलेली काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गुरुकृपायोगात मनुष्याच्या जीवनाचे ध्येय स्पष्ट होणे
‘गुरुकृपायोगात ‘मनुष्याच्या जीवनाचे ध्येय मागील जन्मांतील प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती साध्य करणे’, हेच आहे’, असे सांगितले आहे. त्यामुळे जिज्ञासू आणि साधक यांना ‘सर्वप्रथम आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे ?’, हे स्पष्ट होते. ही स्पष्टता अन्य कुठेही दिसून येत नाही. जीवनाविषयीची स्पष्टता आल्याने साधकाला साधनेशी समरस होणे सुलभ जाते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेचे सार सांगून साधकांना ‘ईश्वरप्राप्ती कशी साध्य करायची ?’, याची दिशा देणे

सनातन धर्मात ४ वेद, १८ पुराणे, १०८ उपनिषदे, ऋषी आणि संत यांनी लिहिलेले पुष्कळ ग्रंथ आहेत. यात ‘ईश्वराचे गुण, कार्य, धर्मशास्त्र, साधना आणि अध्यात्मातील विविध पैलू’ यांविषयीचे भरपूर ज्ञान आहे. हे ज्ञान समजून घेण्यासाठी व्यक्तीला अनेक वर्षे लागतात. हे ज्ञान समजले, तरीही ‘मी नेमके जीवनात काय करायचे ?
याच जन्मात ईश्वरापर्यंत कसे पोचायचे ?’, हे त्या व्यक्तीच्या मनातील प्रश्न अनुत्तरित रहातात किंवा याविषयी त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम गुरुकृपायोगात पुढील प्रक्रियेतून दूर होतो.
२ अ. अध्यात्मातील सार : ईश्वराने परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपाने जिज्ञासू आणि साधक यांना गुरुकृपायोगानुसार साधनेचा मार्ग दाखवला आहे. त्यात सनातन धर्मातील ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असलेले ज्ञान सार रूपात सांगितले आहे. त्यामुळे साधकांची अध्यात्म समजून घेण्यातील अनेक वर्षे वाचतात. कलियुगात व्यक्तीचे आयुष्य मर्यादित आहे.
२ आ. दिशा : गुरुकृपायोगात अष्टांग साधना (टीप) सांगितली आहे. त्यातून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘ईश्वरप्राप्ती कशी साध्य करायची ?’, याची दिशा दिली आहे.
टीप : १. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन २. अहं-निर्मूलन ३. नामजप ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न ५. सत्संग ६. सत्सेवा ७. सत्साठी त्याग ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अष्टांग साधना टप्याटप्प्याने कृतीत कशी आणायची ?’, हे सांगितल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अष्टांग साधना टप्याटप्प्याने कृतीत कशी आणायची ?’, याचे सुलभ भाषेत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे साधकांना हे ज्ञान कृतीत आणणे सुलभ जाते. अष्टांग साधना कृतीत आणल्याने आतापर्यंत अनेक साधक जन्म-मूत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत. त्यांनी प्रथम संतपद आणि नंतर सद्गुरुपद येथपर्यंत जलद गतीने वाटचाल केली आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांसाठी गुरुकृपायोग निर्माण करून अनेक जिवांचे कल्याण, तसेच उद्धार केला आहे’, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२५)