|

नंदुरबार – मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत, मंदिरातून अहिंदूंना व्यापारासाठी प्रवेशबंदी करण्यात यावी, मंदिरे सरकारने नव्हे तर भक्तांनी चालवावीत, मंदिरांचे संघटन व्हावे अशा अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ करण्यात येणार आहे. येथील श्री दंडपाणेश्वर मंदिरात अधिवेशन महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि श्री दंडपाणेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
अधिवेशनात जिल्ह्यातील ६ तालुक्यांतून, तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही जवळपास ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक, पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.
ह.भ.प. खगेन्द्र बुवा महाराज, जळगाव येथील पुरातन सातपुडा निवासिनी श्री मनूदेवी संस्थानचे सचिव श्री. नीलकंठ चौधरी, श्री दंडपाणेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. किशोर वाणी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र सेवक श्री. प्रशांत जुवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनास प्रारंभ झाला.
प्रास्ताविक श्री. किशोर वाणी यांनी केले, तर अधिवेशनात मंदिर संस्कृती जतन आणि संवर्धनाची आवश्यकता या महत्त्वपूर्ण विषयावर ह.भ.प. खगेन्द्र बुवा महाराज यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्याची भूमिका मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक नीलकंठ चौधरी यांनी मांडली. ‘मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे झाली पाहिजेत’, यावर सनातन संस्थेच्या श्री. उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.
कुकरमुंडा येथील गादीपती ह.भ.प. उद्धव महाराज यांनी आशीर्वचनपर मार्गदर्शन केले, तसेच ‘हिंदूंच्या यात्रा, मंदिरे येथे अहिंदूंना व्यवसाय करण्यास बंदी का आवश्यक आहे’, या विषयावर श्री. प्रशांत जुवेकर यांनी विवेचन केले. वस्त्रसंहितेविषयी परिसंवाद घेण्यात आला. शहादा येथील श्री म्हाळसादेवी मंदिराचे विश्वस्त प्रा. गणेश सोनवणे, अधिवक्ता अनिल लोढा आणि प्रा. डॉ. सतीश बागुल यांनी मते मांडली.
अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. सायली पाटील यांनी केले. शंखनाद श्री डुबकेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त आणि गोसेवक श्री. आनंद मराठे यांनी केला. मंदिर संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने काही ठराव संमत करून घेण्यात आले. ठरावाचे वाचन समितीचे श्री. जितेंद्र मराठे यांनी केले. आभारप्रदर्शन समितीचे प्रा. डॉ. सतीश बागुल यांनी केले. अधिवेशनाचा समारोप छाया संगीत साधना संगीत विद्यालयाच्या संस्थापिका सुनीता चव्हाण यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला.
तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन केले जाणार असून भविष्यात धुळे जिल्ह्यात स्वतंत्र मंदिर अधिवेशन घेण्याविषयीही निर्णायक चर्चा झाली.