Nepal Hindu Rashtra Demand : नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही स्थापन करून हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीत वाढ !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे असणार्‍या फलकांचे प्रदर्शन

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काठमांडूमध्ये पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र शहा यांची छायाचित्रे असणारे फलक

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणून नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. काठमांडूमध्ये पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या समर्थकांनी नेपाळमध्ये राजेशाही पुनर्संचयित करण्याची आणि हिंदु धर्माला पुन्हा राज्य धर्म बनवण्याची मागणी केली आहे. ज्ञानेंद्र शहा पश्चिम नेपाळच्या दौर्‍यावरून परतत असतांना ९ मार्च या दिवशी काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनुमाने १० सहस्र लोकांची गर्दी जमली होती. या वेळी जमावाने ‘राजासाठी राजवाडा रिकामा करा’, ‘राजा परत या, देश वाचवा’ अशा घोषणा दिल्या. ‘आपल्याला काय हवे आहे – राजेशाही आणि नेपाळला हिंदु राष्ट्र बनवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी लोकांच्या हातात उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे असणारे फलक होते. यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे. दुसरीकडे राजेशाही परत आणण्याच्या मागणीवर ज्ञानेंद्र शहा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

१. वर्ष २००६ मध्ये प्रचंड निदर्शनांमुळे ज्ञानेंद्र यांना सत्ता गमवावी लागली. २ वर्षांनंतर संसदेने राजेशाही रहित केली. राजेशाही संपल्यापासून नेपाळमध्ये १३ सरकारे स्थापन झाली आहेत. गेल्या काही वर्षांत नेपाळची अर्थव्यवस्थाही घसरली आहे. याचा संदर्भ देत ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांनी सांगितले की, देश वाचवण्यासाठी त्यांना पालट हवा आहे.

२. ज्ञानेंद्र शहा यांच्या स्वागतासाठी आलेल्या ५० वर्षीय कुलराज श्रेष्ठ यांनी वर्ष २००६ मध्ये राजेशाहीचा निषेध केला होता. आता ते राजेशाहीला पाठिंबा देत आहेत. श्रेष्ठ म्हणाले की, देशातील सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार. सत्तेत असलेले सर्व नेते देशासाठी काहीही करत नाहीत. राजेशाही उलथवून टाकणार्‍या निदर्शनांमध्ये मी सहभागी होतो. मला आशा होती की, परिस्थिती सुधारेल; पण तसे झाले नाही. राजेशाही गेल्यापासून राष्ट्र आणखी घसरले आहे; म्हणूनच मी माझा विचार पालटला आहे.