महामेट्रो स्थानकात आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना अटक !

पोलिसांवर पेट्रोल टाकले !

आंदोलनाची छायाचित्रे

पुणे – येथील कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मेट्रो स्थानकात ९ मार्चला विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकले. या आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वानुमती घेतली नव्हती. या आंदोलनाच्या वेळी कार्यकर्त्यांनी २ घंटे मेट्रो सेवा ठप्प केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

पोलिसांना आंदोलनाविषयी माहिती मिळताच पोलीस आंदोलनस्थळी आले आणि आंदोलकांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांशी आंदोलनाच्या संदर्भात संपर्क साधला असता या आंदोलनाच्या संदर्भात वरिष्ठ पदाधिकार्‍यांनाही माहिती नव्हती. नरेंद्र पावटेकर यांनी त्यांनाही शिवीगाळ केली.

आंदोलकांनी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचारी यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. यानंतर मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. शासकीय नोकरांना मारहाण करणे, आश्वासने देणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे, कटकारस्थान करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांनुसार १० महिला आणि ५ पुरुष आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.

संपादकीय भूमिका :

  • पोलीस अधिकार्‍यांवरच पेट्रोल टाकणारे सामान्यांच्या जिवावर उठले, तर त्याला कोण उत्तरदायी ? असे कार्यकर्ते असणार्‍या पक्षावर बंदी का आणू नये ?
  • मेट्रो ठप्प करून जनता आणि प्रशासन यांची हानी करणारे कार्यकर्ते समाजद्रोहीच होत !