उरुळीकांचन (पुणे जिल्हा) येथे गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी

१४ गोवंशियांची सुटका !

प्रतिकात्मक चित्र

उरुळीकांचन (जिल्हा पुणे), १० मार्च (वार्ता.) – श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे गोवंशियांची तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. ८ मार्च या दिवशी उरुळीकांचन येथे जर्सी जातीचे १४ गोवंश निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधून ठेवले होते. गोरक्षकांनी पोलिसांना कळवून घटनास्थळी साहाय्य मागितले. पोलिसांच्या उपस्थितीत गोवंशियांना सोडवून त्यांना सुरक्षित गोशाळेत हालवण्याचा प्रयत्न चालू असतांना साजन पाचपुते, तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे आणि अन्य यांनी गोरक्षकांना धमकावले. साजन पाचपुते यांनी भ्रमणभाषवरून गोरक्षक अक्षय कांचन यांना जिवे मारण्याची धमकी दिली. गोवंशियांची सुटका करत असतांना गोरक्षकांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी, साजन पाचपुते, महेश चव्हाण, शारदा चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ‘गोरक्षा सामाजिक संस्थे’चे गोरक्षक या कार्यात कृतीशील झाले होते.

पोलिसांनी कारवाई न करण्यामागे राजकीय दबाव असल्याचे उघड !

या कारवाईमध्ये राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे सख्खे पुतणे साजन भैय्या सदाशिव पाचपुते यांच्यावरही कसायांना साहाय्य केल्यामुळे आणि गोरक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गुन्हा नोंद केला आहे. साजन सदाशिव पाचपुते हे सध्या नगर जिल्ह्यामधील ठाकरे गटाचे मोठे नेते म्हणून परिचित आहेत. इंदूर न्यायालयामधून त्यांना अटक करण्याचे वॉरंटही निघाले आहे. ते सध्या नगरमध्ये त्यांच्या घरी आहेत; परंतु ‘पोलीस त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत’, असे गोरक्षक अक्षय कांचन यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

  • हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अद्यापही गोवंशियांची तस्करी न थांबणे यासारखे दुर्दैव दुसरे कुठले ? गोतस्करांना पोलिसांचा धाक नाही, हेच यावरून वारंवर सिद्ध होते.  छत्रपती शिवरायांच्या राज्याप्रमाणे गोतस्करांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !
  • राजकीय दबाव, सर्व हितसंबंध, आर्थिक संबंध, भ्रष्टाचार, कामचुकारपणा या सर्वांतून बाहेर पडून पोलीस प्रशासन गोतस्करांना कडक शिक्षा करेल, तेव्हाच राज्यात गोतस्करी थांबेल ! 
  • स्वतःचा जीव वारंवार धोक्यात घालणार्‍या गोरक्षकांना हिंदुत्वनिष्ठ सरकार संरक्षण देईल का ?
  • अल्पसंख्यांकांना संरक्षण आणि गोरक्षकांवर दगडफेक, हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने आणखी किती काळ सहन करायचे ?