
पुणे – आळंदी क्षेत्रातील काही वारकरी शिक्षणसंस्थेत काही चुकीचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे वारकरी संप्रदायाची नाहक अपकीर्ती होत आहे, असे ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना’ प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले. या वेळी त्यांनी आळंदी येथील २०० हून अधिक वारकरी शिक्षण संस्था प्रमुखांशी संवाद साधला. लवकरच या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व वारकरी शिक्षण संस्थांची संयुक्त बैठक मुंबई येथे घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या वेळी ‘शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना’ राज्य समन्वयक किशोरमहाराज धुमाळ यांच्यासह समस्त मान्यवर आणि वारकरी शिक्षण संस्था प्रमुख उपस्थित होते.
अक्षय महाराज भोसले पुढे म्हणाले की,
१. संस्थाचालकांकडे किमान शिक्षण संस्था व्यवस्थापनासाठी मूलभूत ज्ञान आणि परिपक्वता आहे का ? याची पडताळणी होणे आवश्यक आहे. कोणतेही नियमबाह्य वर्तन जर आपणास दिसत असेल, तर स्वतः इतर संस्थाचालकांनी त्याची माहिती पोलिसांना देऊन तात्काळ ती शिक्षण संस्था बंद करणे अपेक्षित आहे; मात्र ‘सरसकट संस्था बंद करा’, ही मागणी चुकीची आहे.
२. चुकीची प्रवृत्ती जर आपल्यात वावरत असेल, तर वेळीच तिला दूर करणे अपेक्षित आहे. कुणी कितीही मोठा असेल, तरी अशा व्यक्तीमत्त्वांचे समर्थन करणार नाही आणि कुणी करत असेल, तर त्यालाही त्यात सह-आरोपी म्हणून सोबत घेतले जावे.
३. आळंदी येथील सर्व वारकरी शिक्षण संस्थांची गुरुकुल शिक्षणपद्धत या अंतर्गत शैक्षणिक संस्था किंवा धर्मादाय संस्था म्हणून नोंदणी होणे आवश्यक आहे.
यासोबतच सर्व संस्था शासन स्थापित वारकरी महामंडळ अंतर्गत कार्य करतील, याचे बंधनही शासनाने घालणे आवश्यक आहे. याशिवाय यात सुसूत्रता आणि पारदर्शकपणा येणार नाही.