मद्रास विद्यापिठाकडून ख्रिस्ती धर्माच्या प्रचारावरील वादग्रस्त व्याख्यान अखेर रहित !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम !

चेन्नई (तमिळनाडू) – येथील मद्रास विद्यापिठाने ‘भारतात ख्रिस्ती धर्मप्रचार कसा करायचा ?’ आणि ‘या धर्माची आवश्यकता काय ?’ या विषयांवर आयोजित केलेले व्याख्यान अखेर रहित करण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम होणार असल्याचे समोर आल्यानंतर हिंदूंनी यास जोरदार विरोध केला होता.

विद्यापिठाच्या इतिहास आणि पुरातत्वशास्त्र विभागाने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या विषयाशी व्याखानाच्या विषयाचा काहीही संबंध नसतांना असे व्याख्यान का ठेवण्यात आले ? एस्. सुब्रमणिया अय्यर या २० व्या शतकातील मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि तमिळ ब्राह्मण यांच्या नावाने आयोजित व्याख्यानाशी ख्रिस्ती धर्माचा काय संबंध ?, असे प्रश्न हिंदूंनी उपस्थित केले होते.

वाढत्या विरोधामुळे विद्यापिठाच्या प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाने एक अधिकृत पत्र प्रकाशित करून कार्यक्रम रहित केल्याची घोषणा केली. विभागप्रमुख डॉ. जे. सुंदरराजन् यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पत्रात कार्यक्रम रहित करण्यामागे प्रशासकीय कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि या व्याख्यानाला मान्यता कशी देण्यात आली ?, या मुख्य सूत्रावर काहीही भाष्य या पत्रात करण्यात आलेले नाही.