
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – राज्याचा रस्ते विकासाचा आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. १ सहस्र लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४ सहस्र गावांतील रस्त्यांचे १ वर्षभरात काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
राज्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणारा ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग’ हा केवळ पर्यटन महामार्ग नाही. या महामार्गाने मराठवाड्याचा वेगाने आर्थिक विकास होईल. कोकण द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांमुळे राज्याचा आर्थिक विकास साधला जाईल.’’ ‘मेट्रो ५’च्या रखडलेल्या कामाविषयीही त्यांनी माहिती दिली.
याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ठाणे ते भिवंडी मेट्रोचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. भिवंडी ते कल्याण या ५ किलोमीटरच्या मेट्रोच्या मार्गात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन आहे. त्यामुळे हा मार्ग भूमीखालून करण्याचा शासनाचा विचार आहे. याचे सर्वेक्षण करण्यासाठी ‘टी.सी.एल्.’ची नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यावर मेट्रोचे काम करता येईल.’’