वेदांमधील मातृत्वभाव !

१. वेदांमध्ये आई आणि मातृत्व यांचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘वेदांमध्ये आई आणि तिचे मूल यांच्यामधील नातेसंबंधाचे वर्णन अनेक पैलूंनी केले आहे. केवळ बाळंतपणानंतरच मातृत्व येते, असे नाही, तर दुर्बलांना प्रेमाने आधार देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी प्रत्येक व्यक्ती ही आईच्याच भूमिकेत असते; म्हणूनच आपल्याला जन्म देणार्‍या आईप्रमाणेच आपले प्रेमाने संगोपन करणार्‍या ईश्वरालाही वैदिक मानव मातृतुल्य समजतो.

वेदांमध्ये उल्लेख केलेल्या ‘मातृ’ शब्दाचा अर्थ समकालीन संस्कृत भाषेत ‘निर्माण करणारी’ असा आहे. वेदकालीन समाजाच्या कुटुंबव्यवस्थेत आईची भूमिका याच्याशीच मिळतीजुळती होती. पुरुषप्रधान संस्कृतीतही मुलांचे संगोपन करणार्‍या आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व घडवणार्‍या आईचे महत्त्वाचे स्थान होते.

‘अथर्ववेदा’तही नमूद केले आहे की, आनंदी कुटुंबात आईचे इतर सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असतात. वैदिककाळात असा विश्वास होता की, आई घराची स्वामिनी आणि संपूर्ण कुटुंबाची निर्माती आहे. विद्वान आणि स्वतंत्र महिलांना, म्हणजेच आईला त्यांच्या मुलांची ‘प्रथम गुरु’ समजले जाते.‘अनुव्रतः पितुः पुत्रो मात्रा भवतु संमनाः ।’

(अथर्ववेद, काण्ड ३, सूक्त ३०, खण्ड २), म्हणजे ‘पुत्र पित्याचा अनुव्रती (पिता करत असलेली अनुकूल कर्मे करणारा) आणि मातेच्या मनासमान मन (विचार) असणारा असावा.’

सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमि वः ।
अन्यो अन्यमभि हर्यत वत्सं जातमिवाघ्न्या ।।

– अथर्ववेद, काण्ड ३, सूक्त ३०, खण्ड १

अर्थ : (सद्गृहस्थहो,) मी तुमच्यासाठी एकरूप हृदये, एकरूप मने आणि अविद्वेष हे नियत करतो. जसे गाय नवजात वत्सावर प्रेम करते, तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करा.

आई आणि मुलगा यांच्या नात्याइतकेच सर्व नातेसंबंध पवित्र आणि अतूट असले पाहिजेत, असे म्हणणे अप्रत्यक्षपणे ‘वैदिक लोकांच्या जीवनात हे नाते किती महत्त्वाचे होते’, हे सिद्ध करते.

२. मातृत्वाचा आदर करणारी वैदिक लोकांची प्रवृत्ती !

लग्नाचा मुख्य उद्देश मुले निर्माण करून वंश पुढे नेणे, हा होता. त्यामुळे ‘विवाहबंधनात अडकलेली स्त्री एक चांगली आई आणि एका धाडसी मुलाला जन्म देणारी माता असावी’,  अशी अपेक्षा होती. त्यासाठी विविध संस्कार विधीही करण्यात येत होते. ‘हे नववधू, आपल्या गर्भातील सर्वांना सामावून घेणार्‍या पृथ्वीप्रमाणे वीर पुत्रा इंद्राणीसारखा सुदृृढ गर्भ धारण कर.  सर्व देवता गर्भाचे योग्य पोषण करोत आणि योग्य वेळी जन्मलेला मुलगा त्याच्या आईचे रक्षण करणारा, शूर अन् महान होवो.’ ही सदिच्छा वेदांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

‘पुत्रवती होणे’, हे स्त्रीच्या भाग्याचा परमोत्कर्ष समजला जात असे. मातृत्वाचा आदर करणारी वैदिक लोकांची प्रवृत्ती अथर्ववेदाच्या खालील ओळींमध्ये नमूद केली आहे. त्यात म्हटले आहे, ‘हे मुली, तुला जन्म देणार्‍या आईची बाजू आणि तुझ्या पतीला जन्म देणारी सासू अन् त्यांचा परिसर दोघांचेही तू मीलन कर.’

वैदिक साहित्यातील काही उपमांमध्येही मातृत्वाच्या विशेष गौरवाचा उल्लेख आढळतो. ‘पुत्रवती स्त्रीच्या सभोवताली जशी तिची मुले जमतात, तसे पुरोहितही सोमभोवती जमतात’ किंवा ‘जशी गाय तिच्या वासराला प्रेमाने चाटते, त्याचप्रमाणे आपले स्तोत्र इंद्राला स्पर्श करोत’ आणि ‘जशी रात्र आईप्रमाणे रक्षण करणारी आहे. दिवस आपल्याला रात्रीच्या स्वाधीन करतो आणि स्वतः विश्रांती घेतो.’

३. देवता आणि निसर्ग यांच्याविषयी वैदिक काळातील लोकांचा प्रेमभाव !

वेदांच्या निवडक श्लोकांमध्ये जगाच्या उत्पत्तीचा विचार केला गेला आहे. या चराचर अस्तित्वाविषयी उत्सुकता व्यक्त केली गेली आहे. यावरूनही वैदिक काळातील लोकांचा देवता आणि निसर्ग यांच्या संदर्भात प्रेमभाव दिसून येतो. ऋग्वेदात देवांसह देवींचीही प्रार्थना करण्यात आली आहे. देवींची संख्या अल्प असूनही त्यांचे जनमानसात एक महत्त्वाचे स्थान होते. यापैकी काहींची आई म्हणून पूजा केली जाते.

४. आपल्या भक्तांना सर्व बंधनांपासून मुक्त करणारी आईस्वरूप अदिती !

या देवींमध्ये ‘अदिती’चे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे. देवांची आई म्हणून अदितीचे वर्णन केले आहे. आदित्यांची आई, म्हणजेच देवांची जन्मदात्री अदिती ही जगातील सर्व राजे, तसेच सर्व महान आणि शक्तीशाली पुत्र यांची आई आहे. एवढेच नाही, तर जगातील सर्व सजिवांवर नियंत्रण ठेवणारी, म्हणजेच जागतिक नियमांचीही स्वामिनी तिच आहे. अदिती ही सर्वांची रक्षण करणारी आहे. सर्वांना कुशलतेने मार्गदर्शन करणारी आहे. तिचे पुत्र, म्हणजेच आदित्य यांच्याशी करण्यात आलेले तिचे स्तवन दुःखांपासून संरक्षण आणि कल्याण मिळवण्यासाठी करण्यात येते.

पाप आणि अपराधीपणा यांपासून मुक्त होण्यासाठी तिची सर्वाधिक प्रार्थना केली जाते. या वर्णनावरून असे म्हणता येईल की, या प्रार्थनेमागील कायमची भावना हीच आहे की, आपण कितीही चुका केल्या, तरी कुणी आपल्याला क्षमा केली किंवा नाही, तरी आपली आई आपल्याला नक्कीच क्षमा करील.‘न दीयते खण्ड्यते बध्यते बृहत्त्वात् ।’, म्हणजे ‘विशालतेमुळे (आकाराने मोठे असल्याने) कोणालाही दिली जात नाही, खंडन (विभाजन) केले जात नाही, बंधनात बांधली जात नाही’, अशी आईच्या रूपात अदितीची प्रतिमा आहे. अनेक ठिकाणी अदितीची कल्पना पृथ्वीच्या रूपात केली गेली आहे. वेदांचे ऋषी म्हणतात, ‘ही पृथ्वी किंवा अदिती हीच आई, वडील, पुत्र, देव इत्यादी आहे. जे काही उत्पन्न झाले, होत आहे आणि होईल, ते पृथ्वीपासूनच !’

५. पृथ्वीला आईसमान मानणारी वैदिक संस्कृती !

अन्नधान्य उत्पादन करणार्‍या पृथ्वीला ‘भूमाता’ म्हणून ऋषिमुनी तिचे गुणगान करतात. पृथ्वीमातेची स्तुती करणार्‍या ‘भूमीसूक्ता’त ऋषी पृथ्वीशी असलेल्या त्यांच्या नात्याचे वर्णन करतांना म्हणतात, ‘माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्याः ।’ (अथर्ववेद, काण्ड १२, सूक्त १, खण्ड १२), म्हणजे ‘भूमी माझी माता आहे, मी पृथ्वीचा पुत्र आहे.’

ज्याप्रमाणे आई तिच्या मुलाला अन्नाचे सार म्हणून दूध पाजून त्याचे पोषण करते, त्याचप्रमाणे पृथ्वीमातेनेही आम्हाला पुष्ट करावे आणि आमची इच्छा पूर्ण करावी. ते पृथ्वीला प्रार्थना करतात, ‘तिच्या आत जिवांचे पोषण करणारे पदार्थ उत्पन्न होतात. त्याचे लाभ आम्हाला मिळावेत.’

पृथ्वीला तृप्त करण्यासाठी ऋषी तांदळाच्या दाण्यांचे स्मरण करून म्हणतात, ‘मी तुम्हाला मंत्रांच्या योग्य पठणासह अग्नीत अर्पण करतो. जशी आई तिच्या मुलांच्या जवळ असते, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या आईच्या, म्हणजेच पृथ्वीच्या जवळ रहा.’ पृथ्वी मानव आणि सर्व सजीव प्राणी यांना पोषण देते, हे वैज्ञानिक सत्य आहे; परंतु आपल्याला सर्वस्व देणार्‍या पृथ्वीला आपली आई मानण्याची आणि तिच्या अमूल्य संपत्तीचा नाश न करता ती अत्यंत संयमाने अन् कृतज्ञतेने स्वीकारण्याची वैदिक मानसिकता अनुकरणीय आहे.

६. मातृतुल्य नद्यांना ‘आईचा दर्जा’ !

भटकंती करणार्‍या वैदिक लोकांचा स्थिर जीवन प्रवास सुलभ करणार्‍या नद्यांनाही ‘आईचा दर्जा’ देण्यात आला आहे. ऋग्वेदातील एका सूक्तामध्ये सरस्वती नदीचा उल्लेख ‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति ।’ (ऋग्वेद, मण्डल २, सूक्त ४१, ऋचा १६), म्हणजे ‘हे मातांमध्ये, नद्यांमध्ये आणि देवींमध्ये श्रेष्ठ अशा सरस्वती’ असा केला आहे. ज्यामध्ये तिला ‘अम्बितमे’ असे संबोधून गौरवान्वित केले आहे.

विश्वामित्र ऋषि विपाश आणि शुतुद्री नद्यांची स्तुती करतांना त्यांना ‘मातृतुल्य’ म्हणतात. ते त्या नद्यांना त्यांचा प्रवाह न्यून करण्याची विनंती करतात. जेणेकरून त्यांना पुढे मार्गक्रमण करता येईल. त्यांच्या या निवेदनामुळे नद्याही खाली वाकतात, जसे आई तिच्या मुलाला स्तनपान करण्यासाठी खाली वाकते.

७. वेदांमधील अष्टमातृकांचे वर्णन !

वेदांमध्ये ‘मातृका’ नावाने ज्या देव समुहांचा उल्लेख केला जातो, ते ८ आहेत. त्यापैकी अष्टमातृकांचे वर्णन अग्रांकित आहे.

ब्राह्मी माहेश्वरी चण्डी वाराही वैष्णवी तथा ।
कौमारी चैव चामुण्डा चर्चिकेत्यष्टमातरः ।।

अर्थ : ब्राह्मी, माहेश्वरी, चण्डी, वाराही, वैष्णवी, कौमारी, चामुण्डा आणि चर्चिका या अष्टमाता आहेत.

या मातृकांची मंदिरे किंवा मूर्ती आजही भारतात विविध ठिकाणी दिसतात. आज दक्षिण भारतात आणि नेपाळसारख्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते. मातेच्या रूपात पूजल्या जाणार्‍या या देवींमध्ये स्त्रीचे पालनपोषण आणि संहारक करणारे अशी दोन्ही रूपे दर्शवली आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, आई तिच्या मुलाच्या हितासाठी परिस्थितीनुसार सौम्य किंवा कठोर होऊ शकते. याखेरीज वेदांमध्ये उषा, वाक्, म्हणजे वाणी, ईडा, पृष्णी, बृहद्दीवा, एकाष्टका इत्यादींचेही सर्व देवांची किंवा अग्नि इत्यादी देवतांची आई म्हणून वर्णन आढळते.

८. भक्तांना ईश्वरातील देवत्वापेक्षा त्यातील मातृत्वभावाचे अधिक आकर्षण !

यासमवेतच वेदमाता म्हणून गायत्री किंवा चंडा यांची स्तुतीही दिसून येते. वेदांनंतर पुराणकाळात आणि आजही ज्यांची प्रामुख्याने उपासना केली जाते, ती लक्ष्मी, पार्वती, सरस्वती आदी देवींकडेही ‘आई’ म्हणून पाहिले जाते. तिची पूजा करून आम्ही हीच इच्छा ठेवतो की, त्यांचे मातृवत् मातृछत्र आम्हाला सतत मिळावे.

अर्धनारीनटेश्वरासारख्या देवतेची उपासनाही हेच सिद्ध करते की, कोणत्याही देवतेला आईरूपी स्त्रीत्वाविना पूर्णत्व प्राप्त होत नाही. निसर्गाच्या मूर्त आणि अमूर्त आविष्कारांसमोर नतमस्तक होऊन त्यात मातृप्रेम पहाणार्‍या वैदिक ऋषींपासून ते आपल्या सर्व गुन्ह्यांना क्षमा करून प्रेमाची सावली देणार्‍या विठ्ठलाला आई (माऊली) समजून त्यांच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकरी समुदायापासून सर्वांना ईश्वरातील देवत्वापेक्षा त्यातील मातृत्वभाव अधिक आकर्षित करतो.’

– प्राची पाठक

(साभार : मासिक ‘विवेक, हिंदी’)