८ मार्च आला की, आपण सर्व मोठ्या उत्साहाने ‘महिला दिन’ साजरा करतो. वर्षाचे ३६५ दिवस असतांना फक्त एकच दिवस महिलांसाठी साजरा करण्याची वेळ का आली ?
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥
– मनुस्मृति अध्याय ३, श्लोक ५६
अर्थ : जेथे स्त्रीचे (सर्वार्थाने) पूजन होते. तेथेच देवतागण संतोषाने आणि प्रसन्नतेने रहातात. ज्या घरात स्त्रियांची अवहेलना होते, तेथील सर्व धर्मकृत्ये निष्फळ होतात.
१. आजच्या महिलांची दुःस्थिती होण्यामागील कारण म्हणजे महिलांनी हिंदु संस्कृतीचे आचरण सोडणे
स्त्रीचे महत्त्व एवढे असतांना आज आपण फक्त एकच दिवस महिला दिन साजरा करण्यामध्ये धन्यता मानतो. याला उत्तरदायी कोण ?, तर निश्चितपणे आपणच याला उत्तरदायी आहोत. आजची परिस्थिती पाहिली, तर स्त्रियांवरील होणारे अत्याचार, बलात्कार, विनयभंग या सर्व प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीमध्ये वाढत असलेला व्यभिचार, स्वैराचार, पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी जाणे. या सर्वाना केवळ पुरुष नाही, तर आपण स्वतः उत्तरदायी आहोत.
आज आपण हिंदु संस्कृतीचे आचरण सोडल्याने कपाळावर कुंकू लावत नाही. कुंकू हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. कुंकू नसल्याने ईश्वरी शक्ती मिळत नाही. मुली किंवा महिला यांच्या हातात बांगड्या नसल्याने मनगटामध्ये शक्ती नाही. त्यामुळे प्रतिकारक्षमता नाही. पायात पैंजण नसल्याने पायामध्ये शक्ती नाही. त्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. आज मुलींना तोकडे कपडे घालण्याची लाज वाटत नाही. याच्यामुळेच आपण अन्यायाचा प्रतिकार करू शकत नाही आणि म्हणूनच या अत्याचारांचे प्रमाण शिगेला पोचलेले आहेत.

आपली हिंदु संस्कृती आणि संस्कार जपले नसल्यामुळे बुद्धी आणि मनही व्यभिचारी झालेले आहे. स्त्री ही अशी शक्ती आहे की, जिच्यामध्येच देवाने केवळ प्रजनन क्षमता निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे, म्हणजेच मूल जन्माला येण्याअगोदर आणि नंतरही स्त्रीच त्याच्यावर संस्कार करते. असे असतांना आज अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे ?, याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.
२. हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे आचरण करणे महत्त्वाचे !
‘महिला शक्ती’, असे म्हटले जाते; कारण महिलेमध्ये साक्षात् दुर्गादेवीची शक्ती असते; परंतु आज ही शक्ती बर्याचदा कुठे वापरली जाते, तर एकमेकांना नावे ठेवणे, शेजारच्याची उणीदुणी काढणे, भांडणे, वायफळ गप्पा मारणे, विशेष करून भ्रमणभाषसंच आणि टीव्ही बघणे येथे वापरली जाते. याउलट या शक्तीचा वापर आपण स्वतः साधना आणि मुलांवर संस्कार करणे यांसाठी केला, तर निश्चितच स्वतःचे घर हे ‘संस्कारक्षम’ होईल अन् अशा प्रकारे घरानंतर, वाडी, तालुका, जिल्हा, राज्य, देश हे संस्कारक्षम व्हायला वेळ लागणार नाही. इतिहासातील उदाहरणातून आपण थोडे जरी आजच्या दिवशी शिकलो, तर येणार्या काळामध्ये महिलांवर होणारे अत्याचार अल्प होतीलच नव्हे, हिंदु संस्कृती आणि स्वधर्म जोपासल्यास निश्चितपणे आपल्याकडे वाईट दृष्टीने बघण्याची कुणाचे धाडस होणार नाही. उद्या जरी कुदृष्टी झाली, तरी आपण त्याचा बिनधास्तपणे प्रतिकार करू करून देवीची कृपा संपादन करू शकतो.
अबला नको तू सबला हो, संस्कृती आणि स्वधर्म आचरून ईश्वरी कृपेस पात्र हो ।।
– अधिवक्त्या सौ. अपर्णा कुलकर्णी