Abu Azmi Suspension : आमदार अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन !

  • औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले !

  • आझमी यांची आमदारकी रहित करण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक !

डावीकडे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले आहे. हिंदूंची मंदिरे पाडणार्‍या, जिझिया कर लावणार्‍या, महिलांवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेब याला चांगला प्रशासक म्हणणार्‍या अबू आझमी यांच्यावर विधानसभेने कारवाई करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे. ५ मार्च या दिवशी अबू आझमी यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या प्रस्तावाला आक्षेप घेत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अबू आझमी यांचे केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते नव्हे, तर त्यांची आमदारकी कायमस्वरूपी रहित करण्याची मागणी सभागृहात केली. या वेळी सर्व सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या ठरावावर मतदान घेतले. सभागृहात हा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या वेळी सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’ ,‘हर हर महादेव’ अशा घोषणा देण्यात आल्या.

 

औरंगजेबासारख्या लुच्च्या, लफंग्याचे उदात्तीकरण करणार्‍यांची आमदारकी रहित करावी ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी २०१७ मध्ये सैनिकांविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या विधान परिषदेतील आमदाराचे निलंबन करून त्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्या आमदाराचे वेतन बंद करण्यात आले, त्याला रेल्वेचे कूपन बंद करण्यात आले. नथुराम गोडसे यांच्याविषयी चांगले उद्गार काढणार्‍याला कारागृहात टाकण्यात आले, मग औरंगजेबासारख्या लुच्च्या, लफंग्या, स्वत:च्या बापाला कारागृहात टाकून बापाला पाणीही न देणार्‍याचे गोडवे गाणार्‍यांचे निलंबन केवळ अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरतेच का ? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमानाचा विषय सभागृहात मांडण्यासाठी कोणत्याही आयुधाची मर्यादा असू नये. केवळ मते मिळवण्यासाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍याचे सदस्यत्व कायमस्वरूपी रहित करण्यात यावे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या निवेदनावर चंद्रकांत पाटील यांनी ‘महाविकास आघाडीच्या काळात महायुतीच्या १२ सदस्यांचे निलंबन करण्यात आल्यावर ते सर्वाेच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने ‘सदस्यांचे कायमस्वरूपी निलंबन करता येणार नाही’, असा निर्णय दिला होता. त्यामुळे ‘अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापुरते निलंबित करून आमदारकी रहित करण्याविषयी समिती स्थापन करू’, असे म्हटले. या वेळी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्या शिक्षेत वाढ झालीच पाहिजे; परंतु छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.