अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची संसदेत घोषणा

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क लादतो. हा योग्य निर्णय नाही. आम्हीदेखील येत्या २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल, त्याला अमेरिका तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आयात शुल्क आकारेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केली. ५ मार्च या दिवशी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सत्राला पहिल्यांदाच संबोधित करतांना ते बोलत होते. या भाषणात त्यांनी दोन वेळा भारताचा उल्लेख केला.
अमेरिकेडून वेगवेगळ्या देशांना दिली जाणारे परदेशी साहाय्य पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. आजच्या भाषणात ट्रम्प यांनी या निर्णयाची माहिती दिली. ‘अमेरिकी नागरिकांचे पैसे अमेरिकेसाठी खर्च केले जातील’, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडलेली सूत्रे
१. युरोपीयन संघ, चीन, ब्राझिल, भारत, मॅक्सिको आणि कॅनडा यांनी अमेरिकेवर आयात शुल्क लादले आहे. हे देश आपल्या वस्तूंवर आयात शुल्क आकारतात. या प्रमुख देशांसह इतरही अनेक देश अमेरिकेकडून भरमसाठ आयात शुल्क वसूल करतात. ते आपल्याकडून जितके शुल्क वसूल करतील, तितकेच शुल्क आता अमेरिका त्या त्या देशांकडून वसूल करेल. भारतासारख्या देशांनी अमेरिकेकडून आयात शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
२. दोन दिवसांपूर्वी मी इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
३. निवडून आल्यानंतर मला आर्थिक संकटात सापडलेली अर्थव्यवस्था मिळाली आहे. महागाई सर्वोच्च बिंदूपर्यंत पोचली आहे. त्यातून मला अमेरिकेला बाहेर काढायचे आहे.
४. ‘गल्फ ऑफ मॅक्सिको’ हे आखात आता ‘गल्फ ऑफ अमेरिका’ या नावाने ओळखले जाईल.
५. अमेरिकी सरकारचे अधिकृत धोरण ठरले आहे की, आपल्या देशात केवळ दोनच लिंग आहेत, स्त्री आणि पुरुष.
६. अमेरिकेचे सरकार ५ मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये (४३ कोटी रुपयांमध्ये) अमेरिकेचे नागरिकत्व देणारे ‘गोल्ड कार्ड’ देत आहे. जगभरातील प्रतिभावान आणि कष्टाळू लोकांना याद्वारे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग प्रदान केला जात आहे.
७. मी लवकरच एका आदेशावर स्वाक्षरी करणार आहे, ज्याद्वारे पोलीस अधिकार्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल.
ट्र्म्प यांनी मानले पाकिस्तानचे आभार !
डॉनल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये काही आतंकवाद्यांना पकडले. आता त्यांना अमेरिकेत आणले जात आहे. या कारवाईच्या वेळी पाकिस्तानी सरकारने आम्हाला साहाय्य केले. त्यासाठी मी पाकिस्तनचे आभार मानतो.
आयात शुल्क हाच अमेरिकेच्या श्रीमंतीचा मार्ग !
ट्रम्प पुढे म्हणाले की, आयात शुल्क हाच अमेरिकेला पुन्हा श्रीमंत आणि महान बनवण्याचा मार्ग आहे. आम्ही जसे ठरवले होते, तसे घडत असून लवकरच आपण श्रीमंत होऊ. थोडा गोंधळ होईल; पण आम्हाला तो मान्य आहे. त्याने फार मोठा फरक पडणार नाही.