कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र घेण्यास सरकारकडून विलंब ! – विरोधकांचा आरोप

मुख्यमंत्री कोट्यातील घर लाटल्याचे प्रकरण

डावीकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘मुख्यमंत्री कोट्यातील घर लाटल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा झालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे त्यागपत्र केव्हा घेणार ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल’, असे सांगितले; मात्र या प्रकरणी विलंब होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर टीका केली. या सूत्रावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहात गदारोळ निर्माण झाला.

१. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शोकप्रस्ताव मांडला जाण्यापूर्वी म्हणाले की, राज्याच्या कृषीमंत्र्यांना न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षेला अद्याप स्थगिती मिळाली नाही. नियमाप्रमाणे त्या मंत्र्यांवर अपात्रततेची कारवाई झाली पाहिजे; पण अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

२. सभापती राम शिंदे यांनी शोकप्रस्तावाच्या वेळी अशी मागणी करता येत नसल्याचे सांगितले. यावर अंबादास दानवे यांनी सांगितले, ‘‘शोकप्रस्तावानंतर असे करता येत नसल्यामुळे मी हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच तशी विनंती केली.’’

३. सभापतींनी हे सूत्र विधानसभेचे असल्याचे नमूद करत संबंधित प्रकरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला; पण विरोधकांनी ‘मंत्री दोन्ही सभागृहांचे असतात’, असे अधोरेखित करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण ?

नाशिक न्यायालयाने २० फेब्रुवारी या दिवशी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका खोटी माहिती देऊन लाटल्याप्रकरणी २ वर्षांचा कारावास आणि ५० सहस्र रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली. यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आले आहे; मात्र निकाल येऊन ११ दिवस होऊनही अपात्रतेची कारवाई न झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.