|
मडगाव, २ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह सूत्रे मांडल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी २८ फेब्रुवारीच्या रात्री कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांच्या मडगाव येथील घरी जाऊन त्यांना खडसावले होते. या प्रकरणी उदय भेंब्रे यांनी बजरंग दलाचे नेते विराज देसाई आणि अन्य कार्यकर्ते यांच्या विरोधात फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. फातोर्डा पोलिसांनी अजून कुणावरही गुन्हा नोंद केला नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असल्याचे पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांनी म्हटले आहे.
तक्रारीत उदय भेंब्रे म्हणतात, ‘बजरंग दलाच्या सुमारे २५ जणांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घराच्या आवारात अनधिकृतपणे प्रवेश केला आणि नंतर गोंधळ घातला.’
उदय भेंब्रे समर्थकांचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह सूत्रे मांडल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांना खडसावल्याची घटना घडल्यानंतर १ मार्च या दिवशी ‘कोकणी भाषा मंडळा’ने मडगाव येथे एक पत्रकार परिषद घेऊन कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांना पाठिंबा दर्शवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ‘कोकणी भाषा मंडळा’च्या अध्यक्षा रत्नमाला दिवकर म्हणाल्या, ‘‘लोकशाहीमध्ये अशा घटनांना स्थान नाही, तरी सरकार अशा वेळी दोषींवर कारवाई का करत नाही ? हा प्रश्न वास्तविक चर्चा करून सोडवायला
पाहिजे होता.’’ (हिंदुद्वेष्टे, धर्मांध ख्रिस्ती आणि मुसलमान अन् पुरोगामी यांनी वाटेल ते बडबडून हिंदु धर्माची, छत्रपती शिवाजी महाराजांची अपकीर्ती करायची आणि हिंदूंनी त्यावर चर्चा करत बसायचे, त्याचे पुरावे देत बसायचे का ? अशांना खडसावलेच पाहिजे ! – संपादक) यानंतर २ मार्च या दिवशी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांच्या समर्थकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी घडलेली घटना ही ‘गुंडगिरी’ असल्याचा आरोप करून या घटनेचा निषेध करण्यासाठी चौगुले मैदानाजवळ सभा घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी केवळ खडसावले की, जर ती ‘गुंडगिरी’, तर मग आंदोलने करून रेल्वेच्या पदरीकरणाचे काम रोखणारे, मशिदीतून हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणारे यांना ‘आतंकवादी’ म्हणायचे का ? कोकणी-मराठी भाषावादाच्या वेळी डोंगरी येथे ज्यांनी हैदोस घातला होता ते, गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकाला मारहाण करणारा बाणावलीचा लोकप्रतिनिधी, कोकण रेल्वे नको म्हणून तोडफोड करणारे या सर्वांना कोणते विशेषण लावायचे ? |