एका दिवसात २०२ विनातिकीट प्रवासी !
मुंबई – मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीसाने एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांना पकडले आणि त्यांच्याकडून ५५ सहस्र २१० रुपये दंड वसूल करण्यात आला. या आधी एका दिवसात १५० प्रवाशांना पकडले होते.
संपादकीय भूमिका : आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय !
वडिलांकडून ४ मासांच्या मुलीची हत्या
मुंबई – तिसरे मूल नको, तसेच त्यातही मुलगी झाली, यामुळे एका वडिलांनी ४ मासांच्या मुलीची पाळण्यातच हत्या केली. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडली. वडिलांनी पाळण्याच्या दोरीने मुलीचा गळा आवळला. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : नात्याला काळिमा फासणारी घटना !
कोकेनची तस्करी, ब्राझीलची महिला अटकेत !
मुंबई – महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्राझीलच्या महिलेला अटक केली. ती ११ कोटी रुपये किमतीच्या कोकेनची भारतात तस्करी करण्याच्या प्रयत्नांत होती. कोकेन असलेल्या सुमारे १०० कॅप्सूल तिच्या पोटातून काढण्यात आल्या.
संपादकीय भूमिका : कठोर कारवाईविना हे प्रकार थांबणार नाहीत !
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभु पाटील !
नवी मुंबई – गेल्या दोन वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांची निवड करण्यात आली. सभापती म्हणून प्रभु पाटील, तर उपसभापती म्हणून हुकूमचंद आंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बाजार समितीचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास ६ महिने शिल्लक आहेत. बाजार घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे संचालक प्रभू पाटील म्हणाले.