वृत्तपत्रातून प्रसिद्धीचे आमीष दाखवून २० लाख रुपये उकळल्याचा आरोप
कर्णावती (गुजरात) – आर्थिक फसवणुकीशी संबंधित (‘मनी लाँड्रिंग’शी संबंधित) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २५ फेब्रुवारी या दिवशी गुजरातमध्ये ‘द हिंदू’चे पत्रकार महेश लांगा यांना अटक केली. ‘ईडी’च्या म्हणण्यानुसार महेश लांगा हे अनेक आर्थिक फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये सहभागी होते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये खंडणी, पैशांची फेरफार आणि विविध व्यक्तींवर मीडिया प्रभावाचा वापर यांचा समावेश होता. हा पत्रकार ‘जी.एस्.टी. इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्या’तही सहभागी आहे, असे ईडीने म्हटले आहे. न्यायालयाने लांगा यांना चौकशीसाठी ४ दिवसांच्या ‘ईडी’ कोठडीत पाठवले आहे.
१. २३ जानेवारी या दिवशी कर्णावतीमधील सॅटेलाइट पोलीस ठाण्यात इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’चे पत्रकार महेश लांगा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. ही तक्रार ‘प्रॉपर्टी डीलर’ (भूमी खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारे) जनक ठाकोर यांनी प्रविष्ट (दाखल) केली होती, ज्यामध्ये त्यांनी लांगा यांच्यावर ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.
२. या तक्रारीनुसार लांगा यांनी ठाकोर यांना सांगितले होते की, ‘द हिंदू’मध्ये त्यांचे नाव प्रकाशित केल्यास त्यांच्या व्यवसायाला पुष्कळ लाभ होईल. जानेवारी २०२४ मध्ये लांगा यांनी ठाकोर यांच्याकडून २० लाख रुपये घेतले आणि एका लेखात त्यांचे नाव समाविष्ट केले. यानंतर त्यांनी पुन्हा २० लाख रुपये मागितले.
३. पत्रकार महेश लांगा यांना ८ ऑक्टोबर २०२४ या दिवशी ‘जी.एस्.टी.’ फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|