गंगाशुद्धतेविषयीचे दूषित ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) !

कुंभमेळ्यातील गंगा प्रदूषणाविषयी घेतल्या जाणार्‍या आक्षेपाचे खंडण करणारा लेख

प्रयागराज येथे पार पडत असलेल्या कुंभमेळ्याला ६० कोटींहून अधिक लोकांनी भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले. ‘प्रयागराज येथे यंदा आलेला महाकुंभमेळ्याचा योग १४४ वर्षांनी आल्याने उभ्या आयुष्यात असा योग पुन्हा मिळणार नाही’, या विचाराने गंगामाता, हिंदु धर्म यांवर श्रद्धा असणार्‍यांनी, तसेच धर्म-अध्यात्म यांच्या सीमारेषेवर असणार्‍यांनी आणि त्याच जोडीला अगदी धर्मविरोधकांनीही प्रयागराजला भेट दिली अन् त्रिवेणी संगमात स्नान केले. सनातन धर्माची अभूतपूर्व शक्ती या निमित्ताने पहायला मिळाली. या कुंभमेळ्याचे आकर्षण, श्रद्धा, तेथील व्यवस्था यांविषयी एक प्रकारचे श्रद्धामय वातावरण संपूर्ण देशभरात निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे एरव्ही अंधश्रद्धा निर्मूलनाची टिमकी वाजवणारे, सनातन धर्माला कावीळ वा मलेरिया म्हणणारे यांचा सनातन द्वेषाचा किडा कुंभमेळ्यामध्ये फार वळवळतांना दिसला नाही. नाही म्हणायला सनातन धर्माचा अभूतपूर्व मेळा पार पडत असतांना आपण अगदीच थंड राहिलो, असे व्हायला नको; म्हणून काही जणांनी गंगामातेच्या शुद्धतेविषयी शंका उपस्थित केली.

१. पुरोगाम्यांचा कांगावा आणि त्यावर शास्त्रज्ञ डॉ. अजय सोनकर यांनी केलेले खंडण

‘गंगामातेचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसून ते प्रदूषित झाले आहे’, अशी आवई काही जणांनी उठवली; पण या खोट्या कथानकाचे लगेचच ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अजय सोनकर यांनी खुले आव्हान देऊन खंडण केले. शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांनी सांगितले, ‘ज्यांना गंगामातेच्या शुद्धतेविषयी शंका किंवा प्रश्न असतील, त्यांनी पाण्याचा नमुना घेऊन माझ्या प्रयोगशाळेत यावे.’ या वेळी त्यांच्या प्रयोगाचे निष्कर्षही त्यांनी सांगितले आणि गंगामातेचे पाणी केवळ अंघोळीसाठीच नाही, तर पिण्यायोग्यही असल्याचे सांगितले.

सौ. गौरी निलेश कुलकर्णी

२. गंगा नदीत दूषित पाणी सोडले जात असतांना त्याविषयी गप्प का ?

कुंभमेळ्यामध्ये गेल्या दीड महिन्यात ६० कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले; मात्र कुठेही रोगराई पसरली किंवा आजारपण आले, अशा प्रकारची घटना घडल्याचे ऐकिवात आले नाही. याउलट शुद्धीकरण प्रकल्प वगैरे असून सुद्धा पुण्यातील खडकवासला धरणाजवळील पाण्यामुळे ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ हा आजार पसरल्याच्या आणि त्यातून काही जण दगावल्याच्याही घटना घडल्या; मात्र त्या वेळी कुणीही पाण्याच्या शुद्धतेविषयी वा वैज्ञानिक चाचणीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. एरव्ही कानपूरजवळ कारखान्यांमधून सहस्रो लिटर दूषित पाणी गंगा नदीमध्ये सोडले जाते; पण पवित्र स्नानामध्ये प्रदूषण शोधणारे लोक या प्रदूषणकारी कारखान्यांवर चालून गेले किंवा त्यांनी त्या विरोधात आवाज उठवला, हे कुठेही ऐकिवात आलेच नाही.

३. हिंदु धर्मविरोधकांचे वैचारिक प्रदूषण दूर करण्याचा संकल्प हिंदूंनी करणे आवश्यक !

हिंदु धर्मशास्त्रानुसार गंगा ही केवळ नदी नसून ती देवनदी आहे. थोडक्यात प्रत्यक्ष देवताच आहे. गंगा नदीत स्नान केल्याने रोग पसरल्याच्या नाही, तर उलट त्वचा रोगासारखे आजार दूर झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत.

तात्पर्य इतकेच की, सनातन धर्माविषयी श्रद्धा असणार्‍यांची अलोट गर्दीच कुंभमेळ्याच्या निमित्ताने पहायला मिळाली. त्रिवेणीत स्नान केलेल्यांनी आता केवळ व्यष्टी गोष्टीपुरते मर्यादित न रहाता गंगा शुद्धतेविषयीच्या दूषित ‘नॅरेटिव्ह’ला प्रत्युत्तर देण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा. मराठीमध्ये पाण्याला ‘आप’ असेही म्हणतात. या नावाच्या राजकीय पक्षाने यमुनेच्या प्रदूषणाविषयी राजकारण केल्याने निवडणुकीत यमुनेनेच त्यांना पाणी पाजले. त्यामुळे गंगेत वा त्रिवेणी संगमात स्नान केलेल्यांनी गंगा नदी आणि सनातन धर्म रक्षणासाठी संकल्प करावा; कारण कथित जलप्रदूषणापेक्षाही हिंदु धर्मविरोधकांचे जे विचार आहेत, ते अधिक प्रदूषणकारी अन् रोगट आहेत.

– सौ. गौरी निलेश कुलकर्णी, फोंडा, गोआ. (२३.२.२०२५)