२३ फेब्रुवारी,२०२५ – थोडक्यात महत्त्वाचे

 

पाहुण्यांच्या नावांच्या पाट्या इंग्रजी भाषेत !

देहली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

नागपूर – देहली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहुण्यांच्या नावांच्या पाट्या इंग्रजी भाषेत होत्या, तर संमेलनाचे नाव ‘ए.बी.एम्.एस्.एस्.’ असे लिहिले होते.

संपादकीय भूमिका : मराठी साहित्य संमेलनात मराठीची अशी दुर्दशा होणे संतापजनक !


मरीन लाईन्स परिसरात भीषण आग !

मुंबई – मरीन लाईन्स परिसरातील एका निवासी इमारतीतील ५ व्या मजल्यावर भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता अधिक असल्याने ज्वाला सदनिकेच्या खिडकीतून बाहेर येत होत्या. या परिसरातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती.


लग्नमंडपात तलवारीने भोसकून हत्या !

नागपूर – गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रियकर असल्यामुळे कुटुंबियांनी प्रेमविवाहास नकार दिला आणि तरुणीचे अन्य युवकासमवेत लग्न ठरवले. याविषयी समजल्यावर प्रियकर प्रेयसीच्या लग्नात तलवार घेऊन आला. त्याने तलवार दाखवून नवरदेवाला धमकी दिली. वधूच्या भावाच्या मित्राने मध्यस्थी केल्यावर प्रियकराने लग्नमंडपातच भोसकून त्याची हत्या केली.


जीबीएस्चा तिसरा मृत्यू

नागपूर – गुईलेन बॅरे सिंड्रोम याचे रुग्ण येथे वाढत असून ३२ वर्षीय तरुणाचा यामुळे मृत्यू झाला असून तिसर्‍या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील मृतांची संख्या आता १२ इतकी झाली आहे.


दानपेटीत जळती काडी टाकली, नोटा खाक !

नाशिक – येथील गणपति मंदिराच्या दानपेटीत एका अल्पवयीन मुलाने जळती काडी टाकली. आतून धूर येऊ लागला. दानपेटीतील सर्व नोटा जळून खाक झाल्या. या प्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले.


पीओपीवरील बंदी हटवा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा ! 

पेण – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातल्याने एक ते सव्वा कोटी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने गणेश मूर्तीकारांच्या बाजूने उभे राहून न्यायालयात भूमिका मांडावी आणि बंदी हटवावी; अन्यथा न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. राज्यातील गणेश मूर्तीकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयावर मोर्चा काढून आंदोलन करतील, अशी चेतावणी महाराष्ट्र गणेश मूर्तीकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी दिली.