Donald Trump : भारताला १८२ कोटी रुपये मिळालेच नाही; ते परत पाठवण्यात आले ! – ट्रम्प यांचा खुलासा

माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप

डावीकडून माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी २ कोटी १० लाख डॉलर्स  (१८२ कोटी रुपये) देण्याची आवश्यकताच काय ? भारतातील मतदानाच्या टक्क्याशी आपल्याला काय करायचे आहे ? आपल्याकडेही बर्‍याच अडचणी आहेत. आपल्याला आपला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे; पण हा पैसा भारताला खरोखर मिळाला आहे का ? तुम्हाला ठाऊक आहे का, हा पैसा भारताला मिळाला आणि त्यांनी खर्च केला ?, असे होत नाही. त्यांनी तो पाठवणार्‍यांना परत केला, असा खुलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशन’च्या बैठकीत भाषण करतांना केला.

भाजपच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी हा पैसा भारताला देण्यात आल्याचा दावा केला होता. आताच्या विधानावरून ट्रम्प यांनी हा पैसा देणार्‍या माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

बांगलादेशालाही २ कोटी ९० लाख डॉलर्स दिले ! – ट्रम्प यांनी दिली माहिती

बांगलादेशामधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी २ कोटी ९० लाख डॉलर्स दिले गेले, तर नेपाळमधील जैवविविधतेसाठी १ कोटी ९० लाख डॉलर्सचा निधी दिला गेला, अशी माहिती ट्रम्प यांनी या भाषणाच्या वेळीच दिली. (हा पैसा खरेच यासाठी खर्च झाला की, शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी झाला, याचीही माहिती ट्रम्प यांनी द्यायला हवी ! – संपादक)

डॉनल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी २ कोटी ९० लाख डॉलर्स देण्याची आवश्यकताच काय ? राजकीय परिस्थितीविषयी कुणालाच काही ठाऊक नाही. नेपाळमधील वित्तीय संघराज्यवादासाठी २ कोटी आणि जैवविविधतेसाठी १ कोटी ९० लाख डॉलर्स देण्यात आले. तसेच आशियातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ७० लाख डॉलर्स खर्च करण्यात आले. आपण या सर्व गोष्टींची काळजी का करत आहोत ? आपल्याकडे बरेच विषय प्रलंबित आहेत. आता आम्ही हे संपुष्टात आणणार आहोत.