अमली पदार्थ तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी नवीन यंत्रणा उभारणार ! – मंत्रीमंडळाचा निर्णय

(‘टास्‍क फोर्स’ म्‍हणजे एखाद्या विशिष्‍ट समस्‍येवर किंवा ध्‍येयावर काम करण्‍यासाठी नियुक्‍त केलेल्‍या लोकांचा विशेष गट)

मुंबई – राज्‍यातील अमली पदार्थ तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नवीन ‘टास्‍क फोर्स’ निर्मितीला संमती दिली आहे. मंत्रालयात झालेल्‍या बैठकीत राज्‍य सरकारने ६ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्‍यात प्रामुख्‍याने वरील निर्णय घेण्‍यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. वरील योजनेसाठी ३४६ नवीन पदे निर्मिती आणि त्याच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मंत्रीमंडळाच्‍या बैठकीतील अन्‍य निर्णय

१. म्‍हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणार्‍या सौर ऊर्जा प्रकल्‍पासाठी १ सहस्र ५९४ कोटींची मान्‍यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ सहस्र १९७ हेक्‍टर क्षेत्राला सिंचन सुविधा.

२. राज्‍यातील रोपवेच्‍या कामांसाठी राष्‍ट्रीय राजमार्ग लॉजिस्‍टिक व्‍यवस्‍थापन लि. ला आवश्‍यक जागा उपलब्‍ध करून देण्‍यास मान्‍यता

३. जळगाव जिल्‍ह्यामधील चाळीसगाव तालुक्‍यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या १ सहस्र २७५ कोटी ७८ लाख रुपयांचे प्रावधान

४. चाळीसगाव, भडगाव तालुक्‍यातील ८ सहस्र २९० हेक्‍टर क्षेत्राला सिंचन सुविधा

५. पुण्‍यातील दिनानाथ मंगेशकर रुग्‍णालयाला नाल्‍यावरील पुलाच्‍या बांधकामासाठी भूमी देण्‍यास संमती

यंदाच्‍या अधिवेशनात डान्‍सबार बंदी कायद्यात सुधारणा विधेयक मांडणार

मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत डान्‍सबार बंदी कायद्याच्‍या संदर्भातही सुधारणा करण्‍याची चर्चा झाल्‍याची माहिती आहे. या संदर्भातील विधेयक मांडले जाऊन संमत केले जाऊ शकते. उच्‍च न्‍यायालयाने या संदर्भात काही सूचना केल्‍या होत्‍या. त्‍यानुसार नव्‍या कायद्यात सुधारणा अपेक्षित आहेत. येत्‍या अधिवेशनात या संदर्भात दुरुस्‍ती होतांना बघायला मिळतील. याच संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाल्‍याची माहिती आहे.