‘लव्‍ह जिहाद’चा कायदा हा सर्वसामान्‍य जनतेच्‍या रक्षणासाठी ! – कौशल्‍य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे – ‘लव्‍ह जिहाद’चा कायदा करण्‍यात काय चुकीचे आहे. आधी राजीखुशीने प्रेम करून लग्‍न करतात. त्‍याचे काही नाही. प्रेम करून पुन्‍हा हत्‍या करायची, याला काय अर्थ आहे का ? त्‍याला आळा घालण्‍यासाठी हा कायदा आहे. सर्वच समाजासाठी हा कायदा आहे, असे कौशल्‍य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. ते औंध ‘आयटीआय’मधील एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करतांना बोलत होते.

मंत्री लोढा पुढे म्‍हणाले, ‘‘लव्‍ह जिहाद’ कायदा करण्‍यासाठी एक समिती स्‍थापन केली आहे. ती अभ्‍यास करून स्‍वत:चा अहवाल सादर करील. हा कायदा करण्‍यासाठी जैन समाजाचा आग्रह होता, यात काहीही तथ्‍य नाही. हा कायदा कुठल्‍या विशिष्‍ट समाजासाठी केला जात नाही. मी महिला आणि कुटुंब कल्‍याण मंत्री असतांनाही या कायद्यासाठी आग्रही होतो.’’

‘लव्‍ह जिहाद’ हा कायदा घटनेच्‍या चौकटीत बसतो का ? – खासदार सुप्रिया सुळे

राष्‍ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्‍या खासदार सौ. सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या की, ‘लव्‍ह जिहाद’ हा कायदा राज्‍यघटनेच्‍या चौकटीत बसतो का ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. राज्‍यघटनेत डॉ. आंबेडकर यांनी कुणी कुणाशी लग्‍न करावे, कुणी कुणाशी प्रेम करावे याचे स्‍वातंत्र्य दिलेले आहे. देश त्‍यांच्‍या (सत्ताधार्‍यांच्‍या) मर्जीने नाही, तर राज्‍यघटनेनुसार चालतो. राज्‍यासमोर प्रचंड आव्‍हाने, जनतेचे प्रश्‍न आहेत. गुन्‍हेगारी आणि बेरोजगारी वाढत आहे, आधी त्‍याकडे पाहिले पाहिजे. (लव्‍ह जिहादद्वारे हिंदु मुली आणि महिला यांची फसवणूक करून त्‍यांचे आयुष्य उद्ध्‍वस्त करणे हा सुप्रिया सुळे यांना गुन्हा वाटत नाही का ? हिंदु मुली आणि महिला यांचे धर्मांधांपासून रक्षण होण्यासाठी कायदा होणे आवश्यक आहे ! – संपादक)