शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन

सोलापूर, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांमुळे राज्याच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारीत वाढ, रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची बंगाल, ‘आसाम’ यांसारखी स्थिती होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, तसेच या घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका आंदोलनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक) सोलापूर जिल्हा परिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ (पूनम गेट) १२ फेब्रुवारी या दिवशी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात सहभागी राष्ट्रप्रेमींनी ‘बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा’, अशा आशयाचे फलक हातात धरले होते. या वेळी अधिवक्ता चंद्रशेखर वारद, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मिनेश पुजारे, किशोर जगताप, राजश्री देशमुख, धनंजय बोकडे, लिंगराज हुळ्ळे, विनोद रसाळ इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या वतीने तहसीलदार दिनेश पागरे यांनी निवेदन स्वीकारले.
संपादकीय भूमिका :आतापर्यंत कह्यात घेतलेल्या बांगलादेशी घुसखोरांवर कोणती कारवाई केली, याविषयीची माहितीही उघड करायला हवी ! |