PM Modi Donald Trump Meet : बांगलादेशाचा विषय पंतप्रधान मोदीच सोडवतील !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पतंप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर केले स्पष्ट !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील दौर्‍याच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची त्यांच्या ओव्हल कार्यालयात भेट घेतली. दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना या वेळी शुभेच्छा दिल्या. या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात व्यापार, रशिया-युक्रने युद्ध आदींचा समावेश होता. यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या विषयांची माहिती दिली. या वेळी बांगलादेशाच्या संदर्भात ट्रम्प यांनी सांगितले, ‘बांगलादेशात निर्माण झालेल्या संकटाला अमेरिका उत्तरदायी नाही. बांगलादेशाचे सूत्र कसे सोडवायचे, ते मी पंतप्रधान मोदी यांच्यावर सोडतो.’ यावर पंतप्रधान मोदी यांच्याकडून कोणतेही विधान करण्यात आले नाही.

रशिया-युक्रेन युद्धावर आम्ही तटस्थ नाही ! – पंतप्रधान मोदी

मी नेहमीच रशिया आणि युक्रेन यांच्या संपर्कात राहिलो असून दोन्ही देशांच्या नेत्यांची भेटही घेतली आहे. अनेकांचा असा गैरसमज आहे की, रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारत तटस्थ आहे; पण भारत तटस्थ नसून आम्ही शांततेच्या बाजुने उभे आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते पुढे म्हणाले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत माध्यमांशी बोलतांना मी सांगितले होते की, ही युद्धाची वेळ नाही. समस्यांचे निराकरण युद्धभूमीवर नाही, तर चर्चेच्या टेबलवर निघते. युद्धावर तोडगा तेव्हाच निघू शकेल, जेव्हा रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश चर्चेच्या व्यासपिठावर येतील. ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांनामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात ते लवकरच यशस्वी होतील, अशी आशाही मोदी यांनी व्यक्त केली.

याच संदर्भात ट्रम्प म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांमधील युद्ध थांबवण्यात चीनची भूमिकाही महत्त्वाची आहे. कोविड महामारीच्या आधीपर्यंत चीनसमवेत माझे संबंध चांगले होते. चीन जगातील महत्त्वाचा देश आहे. चीन, भारत, रशिया आणि अमेरिका एकत्र काम करू शकतात.

आतंकवादी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी ट्रम्प यांची मान्यता

आतंकवादी तहव्वूर राणा

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आतंकवादविरोधी सहकार्यावर भर दिला. या लढाईत अमेरिकेने भारताला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणातील आरोपी तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाला ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हा निर्णय घोषित केला आणि भविष्यात आणखी प्रत्यार्पणाचे संकेत दिले. ते म्हणाले की, आम्ही एका अतिशय हिंसक माणसाला (तहव्वुर राणा याला) त्वरित भारतात परत पाठवत आहोत. याबाबत आमच्याकडे बर्‍याच विनंत्या आल्या आहेत. आम्ही गुन्ह्यांच्या विरोधात भारतासमवेत काम करतो आणि आम्हाला भारताची परिस्थिती सुधारायची आहे.

२१ जानेवारी या दिवशी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. राणा सध्या लॉस एंजेलिस येथे तुरुंगात आहे.

बेकायदेशीर स्थलांतरितांना भारत परत घेणार !

बेकायदेशीर स्थलांतराच्या सूत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इतर देशांमध्ये बेकायदेशीरपणे रहाणार्‍या लोकांना तिथे रहाण्याचा कायदेशीर अधिकार नाही. भारत आणि अमेरिका यांचा विचार करता, आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की, जर अमेरिकेत कुणी भारतीय नागरिक बेकायदेशीरपणे रहात असल्याचे अढळल्यास, भारत त्यांना परत घेण्यास सिद्ध आहे.

मोदी पुढे म्हणाले की, हे लोक सामान्य कुटुंबातील असतात. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवली जातात. बहुतांश लोकांना दिशाभूल करून आणले जाते. त्यामुळे मानव तस्करीमध्ये गुंतलेल्या या संपूर्ण प्रक्रियेवर वार करण्याची आवश्यकता आहे. मानव तस्करी बंद करण्यासाठी या प्रकारच्या प्रकियेला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका मिळून प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेतील सूत्रे

गौतम अदानी यांच्यावर चर्चा झाली नाही !

‘बैठकीत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत प्रविष्ट (दाखल) झालेल्या खटल्याबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का ?’ असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, भारत एक लोकशाही देश आहे आणि भारताची संस्कृती ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आहे. आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे, असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक सूत्रावर चर्चा करत नाहीत.

सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदानी यांनी भारतीय अधिकार्‍यांना सुमारे २ सहस्र १०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्यावरून अमेरिकेत गुन्हा नोंदवण्यात आला होता. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर एका कार्यकारी आदेशाद्वारे न्याय विभागाला अदानी समुहाची चौकशी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

चीनच्या सूत्रावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात भारत-चीन सीमावादाच्या सूत्रावरही या भेटीत चर्चा झाली. पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, भारत-चीन सीमेवर भयंकर चकमकी बघायला मिळतात आणि मला असे वाटते की, असेच चालत राहील. हे सगळे थांबवण्यासाठी जर मी काही साहाय्य करू शकलो, तर मला पुष्कळ आनंद होईल. हे खूप काळापासून चालू आहे, जे खूपच हिंसक आहे.
यावर भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, आमचे कोणत्याही शेजारी राष्ट्रासमवेतची जी सूत्रे आहेत ती आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू.

कराच्या संदर्भात वाटाघाटी करण्यास भारत सिद्ध ! – ट्रम्प

अमेरिकेतून भारतात येणार्‍या वस्तूंवरील कराविषयी ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या श्रद्धेने भारताच्या अन्याय्य आणि अतिरिक्त शुल्कामध्ये कपात करण्याची घोषणा केली. जी एक मोठी समस्या आहे, असे मी म्हणायलाच हवे. भारत अनेक वस्तूंवर ३०, ४०, ६० आणि अगदी ७० टक्के कर लादतो. काही प्रकरणांमध्ये तर त्याहूनही अधिक. उदाहरणार्थ भारतात येणार्‍या अमेरिकी चारचाकी वाहनावर ७० टक्के कर लावल्याने त्या गाड्या विकणे जवळजवळ अशक्य होते. आज भारतासमवेत अमेरिकेची व्यापारी तूट जवळजवळ १०० अब्ज डॉलर्स आहे आणि पंतप्रधान मोदी आणि मी सहमत झालो आहे की, आपण दीर्घकाळापासून चालत आलेली असमानता दूर करण्यासाठी वाटाघाटी करू. आम्ही तेल आणि वायू, एल्.एन्.जी.च्या विक्रीद्वारे तूट सहजपणे भरून काढू शकतो. कारण जगातील इतर देशांपैकी आमच्याकडे एल्.एन्.जी. उत्पादने सर्वाधिक आहेत. भारत आणि अमेरिका यांनी ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार केला आहे जो अमेरिका भारताला तेल आणि वायू यांचा प्रमुख पुरवठादार म्हणून पुनर्संचयित करेल. तसेच भारतीय बाजारपेठेत सर्वोच्च स्तरावर अणु तंत्रज्ञानासाठी अमेरिकेचे स्वागत करण्यासाठी भारत त्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करत आहे. यामुळे लाखो भारतियांना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी वीज मिळेल अन् भारतातील अमेरिकी नागरी अणू उद्योगाला अब्जावधी डॉलर्स मिळतील.

पंतप्रधान मोदी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आयात शुल्काच्या सूत्रावर धोरणांवर पंतप्रधान मोदी यांना भेटण्यापूर्वी स्वाक्षरी केली होती. या धोरणानुसार आता इतर देश अमेरिकेवर जितके शुल्क आकारतात तितकेच शुल्क अमेरिका त्यांच्यावर लादणार आहे.

ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदी यांचे कौतुक

‘तुम्ही नेहमीच पंतप्रधान मोदी यांना ‘उत्तम वाटाघाटी करणारे’ (नेगोशिएटर) म्हणता; पण आजच्या वाटाघाटीत कुणी कुणावर मात केली ?’ या प्रश्नाला उत्तर देतांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हसले आणि म्हणाले की, वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणीही धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत.

संपादकीय भूमिका

पंतप्रधान मोदी आता बांगलादेशाचा विषय तत्परतेने सोडवतील, अशी  भारतियांना आशा आहे. यातून तेथील हिंदूंचे रक्षण होण्यासह ईशान्य भारताचे रक्षण होईल. यासाठी सर्व भारतीय पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी उभे आहेत !