दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘क्लीन चिट’ देण्याचा प्रयत्न !

‘ससून’च्या अहवालावरून आरोप 

पुणे – काही दिवसांपूर्वी गर्भवती माता तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमांतून करण्यात येत आहे. या प्रकरणातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे (ससूनचे) अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ‘क्लीन चिट’ (आरोपमुक्त) देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा ‘आय.व्ही.एफ्.’ सेंटरमधील रुग्णाची कागदपत्रे, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, आधुनिक वैद्यांचे, रुग्णालय प्रशासनाचे आणि कुटुंबियांची साक्ष अशा प्रकारची सर्व कागदपत्रांची पडताळणी ‘ससून’च्या समितीकडून करण्यात आली.

चौकशी अहवालातील सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 

गर्भवती माता तनिषा भिसे यांना सूर्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांची प्रसूती झाली; मात्र रुग्णालयात कोणतीही कार्डिअ‍ॅक स्पेशालिटी सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णाला हृदयविकाराचा धोका वाढला होता. त्यामुळे जवळपास २ घंटे ‘सी.पी.आर्.’ (हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास थांबल्यास व्यक्तीला पुनरुज्जीवित करण्यासाठी वापरली जाणारी आपत्कालीन उपचार प्रक्रिया) देण्यात आला. तनिषाची वैद्यकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती. तनिषाचा मृत्यू ‘मणिपाल’मध्ये झाला. हा मातामृत्यू असतांनाही त्यांनी शवविच्छेदन केले नाही. ससून रुग्णालयाला त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणे आवश्यक होते; पण ते झाले नाही. या सगळ्यात ‘इंदिरा आय.व्ही.एफ्.सेंटर’चे दायित्व येते. त्यांनी लवकर रुग्णाला ‘रेफर’ करायला हवे होते, असे ‘ससून’च्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘तो’ अहवाल जाळला पाहिजे ! – खासदार सुप्रिया सुळे

मला विश्वासच बसत नाही की, असा काही अहवाल येऊ शकतो ? तो अहवाल जाळून टाकला पाहिजे. एवढा चुकीचा अहवाल कसा येऊ शकतो ? हे धक्कादायक आणि असंवेदनशील आहे. आम्ही तो अहवाल स्वीकारणार नाही.