उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते आज आळंदीत महिलांचा सन्मान सोहळा !

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे – ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना’ आणि ‘श्रीमंत माऊली प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा २० एप्रिल या दिवशी पार पडणार  आहे. हा विशेष सोहळा दुपारी ४ वाजता, सदगुरु श्रीअमृतनाथ स्वामी महाराज संस्थान सभागृह, श्रीक्षेत्र आळंदी, पुणे येथे होणार आहे. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याला मान्यता मिळावी, या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे मार्गदर्शन स्वीकारले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, सेवा, साधना आणि संस्कृती या क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

समाजात आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करणार्‍या आणि लोकहितासाठी कार्य करणार्‍या स्त्रियांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले, ‘श्रीमंत माऊली प्रतिष्ठान’च्या प्रमुख श्रीमती विनिता माऊली सपनेस आदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.