उजनी धरणातून श्री पळसनाथाच्या मंदिराचे सप्तभूमीज शिखर पाण्याबाहेर !

पाणीसाठा अल्प होत असल्याने मंदिराचे दर्शन !

श्री पळसनाथ मंदिर

पळसदेव (पुणे) – उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेल्या पळसदेव (तालुका इंदापूर) येथील

श्री पळसनाथांच्या प्राचीन मंदिराचे सप्तभूमीज शिखर पाण्याबाहेर आले आहे. गेल्या वर्षी हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. उजनी धरणाच्या बांधणीनंतर वर्ष १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली. त्यानंतर २४ वर्षांनी म्हणजे वर्ष २००२ मध्ये मंदिर प्रथमच पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. त्यानंतर वर्ष २०१३, वर्ष २०१७, वर्ष २०२३, वर्ष २०२४ मध्ये मंदिर पाण्याबाहेर आले होते. सीना माढा, दहीगाव, बोगदा आणि मुख्य कालव्यातून पाण्याचे आवर्तन चालू आहे. प्रतिदिन १० सहस्र क्युसेकहून अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू असल्याने, धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने अल्प होत आहे. पाणी सोडण्याचे प्रमाण कायम राहिल्यास आणि पाऊस न पडल्यास काही दिवसांत मंदिर पूर्णपणे बाहेर येण्याची शक्यता आहे.

पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, प्राचीन स्थापत्य कलेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, ३ बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता आणि व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर आहे.