अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोह कार्यक्रम !

चौंडी (अहिल्यानगर), १२ फेब्रुवारी (वार्ता.) – अहिल्याबाईंच्या रूपाने चौंडीच्या भूमीतच ३०० वर्षांपूर्वी बलीदान, न्याय आणि धर्म यांचा वटवृक्ष सजला होता. त्यांनी माळवा प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारले होते. अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी राज्य म्हणजे धर्माधिष्ठित सत्ताकारणाचा आदर्श होय, असे प्रतिपादन ‘लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती’च्या सचिव कॅप्टन मीरा दवे (निवृत्त) यांनी केले. चौंडी येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोहा’च्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ‘राष्ट्रसेविका समिती’च्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भाग्यश्री साठे, ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’च्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही. शास्त्री उपस्थित होते.
कॅप्टन मीरा दवे (निवृत्त) पुढे म्हणाल्या, ‘‘लोकमाता अहिल्यादेवींची दृष्टी ही राष्ट्रव्यापी होती. मातृशक्तीने घरापर्यंत मर्यादित नसावे. घरातून झालेले संस्कार समाज घडवतात आणि समाजातून राष्ट्र निर्माण होते. त्यामुळे अहिल्याबाईंच्या कर्तृत्वातील एक अंश आपल्यातही रूजायला हवा.’’
सोहळ्याच्या उद्घाटन सत्रात विधान परिषेदेचे सभापती आणि अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज राम शिंदे यांनी सांगितले की, व्यक्तिगत आयुष्यात अनेक दुःखे असतांना अहिल्यादेवींनी राष्ट्रनिर्माणाचे आणि लोकसेवेचे कार्य अविरत चालू ठेवले. सामाजिक न्याय, महिला कल्याण, व्यापार, कृषी आणि न्यायव्यवस्थेत त्यांनी केलेले कार्य आज आपल्यासाठी दिशादर्शक आहे. संपूर्ण राष्ट्रासाठी अहिल्यादेवी एक प्रेरणास्रोत आहेत.
या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’च्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, माजी मंत्री आणि चौंडी विकास प्रकल्पाचे निर्माते अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते. या प्रसंगी राज्याच्या महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या.