Converting Hindus Into Christians : गुजरातमध्ये पैसे देऊन हिंदूंना ख्रिस्ती बनवणार्‍या दोघांना अटक !

सुरेंद्रनगर (गुजरात) – गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात स्थानिक हिंदूंना ख्रिस्ती पंथामध्ये धर्मांतरित करण्यासाठी रोख रक्कम आणि इतर आमिषे दाखवल्याच्या आरोपाखाली दोन ख्रिस्ती व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. रतिलाल परमार आणि भंवरलाल पारधी या आरोपींनी काही हिंदूंना धर्मांतरासाठी २० सहस्र रुपये रोख दिले होते. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

१. वडाली पोलीस ठाण्याचे प्रभारी पधेरिया यांनी सांगितले की, रतिलाल परमार आणि भंवरलाल पारधी यांनी हिंदूंना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्याचे आमीष दाखवले होते. ‘ख्रिस्ती पंथ स्वीकारल्यानंतर त्यांचे असाध्य आजार बरे होतील’, असा दावाही त्यांनी केला होता.

२. तक्रारदार रणजित भांगू यांनी आरोप केला आहे की, दोन्ही आरोपींनी हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरले आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला. यानंतर रणजित भांगू यांनी विहिंप आणि बजरंग दल यांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना याची माहिती दिली.

३. विहिंप आणि बजरंग दल यांच्या स्वयंसेवकांनी वडाली पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ (धार्मिक श्रद्धेचा अपमान) आणि गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) कायदा याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांतरविरोधी कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, अशी ओरड करणारे सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांना गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे दिसत नाही का ? यातून सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड होतो !