Pro-Khalistan Poster Row : पंजाबमध्ये हिमाचल प्रदेशाच्या परिवहन विभागाच्या बसवर खलिस्तानींचे आक्रमण

बसवर खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवालेचे छायाचित्र असणारे पत्रक न चिकटवल्याने आक्रमण

अमृतसर (पंजाब) – पंजाबमधील खरार येथे हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसवर आक्रमण करण्यात आले. गाडीतून प्रवास करणार्‍या तरुणांनी बसच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. या आक्रमणात जीवितहानी झाली नाही. या वेळी चालक, वाहक आणि प्रवाशी यांनी कसेबसे स्वतःचे प्राण वाचवले. आक्रमणकर्ते नंतर पळून गेले. या आक्रमणाचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

१. या आक्रमणापूर्वी पंजाबमध्ये हिमाचलच्या बसगाड्या थांबवण्यात आल्या आणि त्यावर खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे छायाचित्र असणारी पत्रके  चिकटवण्यात आली. ‘जर हिमाचलहून येणार्‍या कोणत्याही बसमध्ये भिंद्रनवालेचे पत्रक चिकटवलेले नसेल, तर त्यांना पंजाबमध्ये प्रवेश दिला जाणार नाही’, अशी धमकी खलिस्तानींनी दिली होती.

२. पंजाब पोलिसांनी सांगितले आहे की, बसवर आक्रमण करणार्‍यांना लवकरच अटक केली जाईल. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.

३. काही दिवसांपूर्वी भिंद्रनवालेच्या पत्रकावरून हिमाचल प्रदेशात वाद निर्माण झाला होता. स्थानिक लोक आणि पोलीस यांनी शीख तरुणांच्या दुचाकीवर लावण्यात आलेले खलिस्तानचे झेंडे काढून टाकले होते.

संपादकीय भूमिका

खलिस्तानी उघडपणे कारवाया करत असतांना पंजाब पोलीस झोपा काढत आहेत का ? पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्यापासून खलिस्तानींविषयी बोटचेपे धोरण राबवले जात आहे. हे लक्षात घेता देशाच्या सुरक्षेवरून पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक झाले आहे !