MP Death Penalty For Minor Rapist : मध्यप्रदेशात ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा !

दोषीला साहाय्य केल्यावरून त्याच्या आईला आणि बहिणीला २ वर्षांचा कारावास

आरोपी अतुल निहार

भोपाळ (मध्यप्रदेश) : भोपाळमधील शाहजहानाबाद येथे २४ सप्टेंबर २०२४ या दिवशी ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या अतुल निहार याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. याखेरीज त्याला ३ गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि २ गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात अतुलला साहाय्य केल्यावरून त्याची आई आणि बहीण यांना प्रत्येकी २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आणि अतुलला वाचवण्याचा आरोप होता.

नवीन ‘भारतीय न्याय संहिता कायद्या’अंतर्गत मध्यप्रदेशात हा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. या वेळी न्यायालयाने म्हटले की, हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांच्या श्रेणीत येतो. जर आपण मुलांना सुरक्षित वाटेल, असा समाज देऊ शकलो नाही, तर सुसंस्कृत समाजाची कल्पना करणे कठीण आहे. जर मृत्युदंडापेक्षा मोठी शिक्षा असती, तर आरोपीला ती मिळाली असती. अतुलने मुलीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले आणि तिने प्रतिकार केल्यावर शरिराच्या इतर भागांवरही वार केले. अतुलने नियोजनबद्ध पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. अतुल क्रूर आणि निर्दयी होता.

संपादकीय भूमिका

जर प्रत्येक बलात्कार्‍याला फाशी दिली गेली, तर अशा घटना थांबू शकतील !