श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराचा जिर्णाेद्धार करण्याची पुजारी आणि ग्रामस्थ यांची मागणी !

हिंदुत्वनिष्ठांचा पाठिंबा

सोलापूर – पुरातत्व विभागाकडून श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिराची ७ कोटी रुपयांची कामे चालू आहेत. या अंतर्गत गर्भगृहातील फरशा काढण्यात आल्या आहेत; मात्र त्यामुळे गर्भगृहाच्या चारही कोपर्‍यांतील शिळांना तडे गेले आहेत. श्री तुळजाभवानीदेवीची मूर्ती सुरक्षित राहिली पाहिजे. गाभारा, शिखरासह अन्य कामेही महत्त्वाची आहेत. त्यामुळे पूर्ण मंदिराचाच जिर्णाेद्धार केला पाहिजे, अशी मागणी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासन यांच्याकडे केली आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. या वेळी श्री. गंगणे यांनी गाभार्‍याची नीट बांधणी करण्यासह तो मोठा करण्यावरही भर दिला आहे.

श्री. गंगणे यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन धाराशिवच्या जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द केले आहे.