PUNE Hindutva Rally : शेवटच्या बांगलादेशी घुसखोराला हाकलेपर्यंत आंदोलन चालू रहाणार !  – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

भारताला बांगलादेशी घुसखोरमुक्त करण्याच्या मागणीसाठी पुणे येथील भव्य मोर्चात हिंदु राष्ट्र समन्वय समितीचा निर्धार !

मोर्चामध्ये सहभागी हिंदुत्वनिष्ठ

पुणे – देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बांगलादेशी घुसखोराला देशातून हद्दपार करा, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करा. संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ (एकाच ठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात झडती घेणे) राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा. पोलिसांना १५ मिनिट द्या, ते संपूर्ण देश बांगलादेशी घुसखोरमुक्त करतील.

जोपर्यंत शेवटच्या बांगलादेशी घुसखोरावर देशातून कारवाई होत नाही, तोपर्यंत हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आंदोलन चालू राहील, असा निर्धार हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला.

तसेच ‘राष्ट्र की रक्षा हम करेंगे, राष्ट्ररक्षक कहलायेंगे । भगवा थामे संकल्प लिया है, हर बांगलादेशी घुसपेठीया भगायेंगे ।’, असा संकल्पही त्यांनी या वेळी केला. केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपति मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दुपारी ३.३० वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी श्री. घनवट बोलत होते. या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने पुण्याचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने वरील मागणीचे निवेदन स्वीकारले.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक 

 

मोर्चामधील सहभागी संघटना

डावीकडून कु. क्रांती पेटकर, सौ. हर्षदा फरांदे, सौ. उज्ज्वला गौड, निवेदन स्वीकारतांना पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, श्री. रमेश शिंदे, श्री. सुनील घनवट, श्री. सचिन घुले, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड

या मोर्चामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, योग वेदांत समिती, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वन्दे मातरम् संघटना, श्री स्वामी समर्थ मंदिर दिंडोरी प्रणित, महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संप्रदाय, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपति ट्रस्ट, समस्त हिंदु आघाडी, पतीत पावन संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा, राष्ट्र प्रथम प्रतिष्ठान, ॐ जय शंकर प्रतिष्ठान आदी संघटनांसह हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले, तसेच ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

विविध मागण्यांचे हाती घेतलेले फलक !

या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी विविध घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ‘बांगलादेशामधील हिंदूंचे रक्षण करा त्यांना संरक्षण द्या’, ‘भारत में एन्.सी.आर्. तुरंत लागू करो !’, ‘बांगलादेश में हो रहा हिंदुओका नरसंहार तुरंत रोको ।’ अशा प्रकारच्या घोषणा लिहून हातात घेतलेले फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या संपूर्ण सेवेमध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

जनतेने एकमुखाने मागणी केल्यास सरकारला बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येकडे लक्ष देणे भागच पडेल हे निश्‍चित ! प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून घुसखोरांविरोधात आवाज उठवला पाहिजे. सरकारने इतर देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही समितीने या वेळी व्यक्त केली.